रत्नागिरी : जेथे राष्ट्रीय कार्य असेल, तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक उभा असेल आणि स्वयंसेवक हा नेहमी तन, मन, धन अर्पण करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग देतो, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.नाणीज येथे नरेंद्र महाराज संस्थानतर्फे आयोजित महारक्तदान शिबिराचे भागवत यांनी उद्घाटन केले. हिंदुभाव सोडून दिला, तर काय होते, त्याला इतिहास आणि वर्तमान साक्षीदार आहे, असे सांगून भागवत म्हणाले, विविधतेतून एकता हे सूत्र भारताने आजवर पाळले आहे. भारतातील हा गुण अन्य देशात कोठेही दिसणार नाही. त्यामुळे सर्व देश आपल्याकडे आशेने पाहत आहेत. आपल्या देशात सत्ताधीशांच्या गोष्टी चालत नाहीत, इतर जगात त्या चालतात. आपल्या देशात सत्ताधीश, कोट्यधीश खूप होऊन गेले, अजूनही आहेत. मात्र, आमच्याकडे त्याच माणसांची सत्ता चालते, ज्यांनी पितृवचनासाठी सत्तेवर लाथ मारून १४ वर्षे वनवास भोगला. सत्य, करुणा, शुचिता व तपश्चर्या या चार पायांवर धर्म उभा राहतो. कलियुगात यातील एक पाय शिल्लक आहे आणि त्यावर धर्म उभा आहे. मात्र, ही स्थितीदेखील बदलेल, पण हा बदल व्हायला वेळ लागेल, असे भागवत म्हणाले. संकलित झालेल्या रक्तपिशव्यांचा पुण्यातील लष्कराच्या रुग्णालयाने स्वीकार केला. (प्रतिनिधी)
राष्ट्रीय कार्य तेथे राष्ट्रीय स्वयंसेवक
By admin | Published: October 17, 2016 3:51 AM