बारामती – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर आल्या होत्या. बारामती माझे माहेर आणि कर्मभूमी असून इथली लोकं कायम माझ्यासोबत राहिले आहेत. मतदारसंघात विकास कामांची पाहणी करण्यासाठी आली. इथले कार्यकर्ते पवार कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे कार्यकर्ते कुणाकडेही असले तरी त्याचा चुकीचा आणि वेगळा अर्थ काढू नका असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
खासदार सुप्रिया सुळेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, माझे राजकारण हे समाजकारण आहे. मी पक्षाकडे फक्त लोकसभेचे तिकीट मागितले आहे. मी राजकारणात ३ कामांसाठी आलीय. सेवेसाठी, लोकांचा, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी आलीय. त्यामुळे मी एक सेवक म्हणून गेल्या १५ वर्षापासून बारामतीच्या लोकांनी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहील. दिल्ली दरबारी माझं संसदीय कामकाज पाहता. बारामती लोकसभा मतदारसंघाची आन, बान, शान लोकसभेत पहिल्या नंबरवरच राहील यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहींच्या विचारात अंतर आले आहे. त्याचा पवार कुटुंबाशी काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. गेली २४ वर्ष पवारांचे नेतृत्व मान्य करून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रचंड कष्ट केलेते. आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात आलोय. राष्ट्रवादीतील काही घटकांना असं वाटते. वेगळ्या विचारधारेसोबत जावे तर काहींनी याच विचारावर ठाम राहायचे ठरवले. त्यामुळे ही वैयक्तिक मतभेद नाहीत. हे वैचारिक मतभेद आहेत. त्यात गैर नाही असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, अनेक वर्षे एन. डी पाटील यांनी वेगळ्या विचारधारेच्या चौकटीत राजकारण केले. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस वेगवेगळे राजकारण असताना नाते जपले, इतकी प्रगल्भता पवार कुटुंबाकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वैचारिक भूमिका आहे. काहींनी वेगळी भूमिका घेतली त्यामुळे अंतर आहेत. आज आमच्यात वैचारिक मतभेद आहेत मनभेद नाहीत असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
निवडणूक होईल असं वाटत नाही
केंद्रातला आणि महाराष्ट्रातलं सरकार सातत्याने सर्व्हेने निवडणूक लावतात. सर्व्हे फारसा चांगला नसल्याने अजूनही सरकारने महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका घेतल्या नाहीत हे चांगले नाही. दीड वर्ष उलटले तरी निवडणूक नाहीत. सामान्य माणसांनी त्यांची कामे कोणाकडे न्यायची. त्यामुळे निवडणूक होणे गरजेचे आहे. परंतु निवडणूक होतील असं वाटत नाही असा आरोपही सुप्रिया सुळेंनी केला.