मुंबई : बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहींची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळेच मधुमेहाविषयी जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यंदा आरोग्य दिनाची संकल्पना ‘मधुमेहाशी लढा’ अशी ठेवली होती. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडंट डॉक्टरर्स’ने (मार्ड) मुंबईत मधुमेहाविषयी सर्वेक्षण केले. यात कुटुंबात कोणालाही मधुमेह नसल्यास त्या व्यक्तीला मधुमेह होण्याचा धोका नसतो, असे मत ११० जणांनी मांडले. मधुमेहाबद्दल हाच सर्वात मोठा गैरसमज असल्याचे मार्डने म्हटले आहे. एकूणच या सर्वेक्षणातून मधुमेहाविषयी अजूनही सामान्य जनतेमध्ये गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील नायर, केईएम, सायन आणि जे. जे. रुग्णालयात हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २०० व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या सर्वांना मधुमेहाविषयी १० प्राथमिक प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणातून मिळालेल्या समोर आलेल्या माहितीनुसार अजूनही मधुमेहाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून आले.मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. सध्या फक्त ज्येष्ठांनाच मधुमेह होतो, अशी परिस्थिती राहिलेली नाही. तरीही अनेकांना मध्यम वयानंतरच मधुमेह होतो, असा गैरसमज आहे. त्याचबरोबर मधुमेह हा संसर्गाने होतो, असे ४० जणांना वाटले. हे अत्यंत धक्कादायक होते. त्याहून अधिक गंभीर म्हणजे ६० व्यक्तींनी मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो, असेही सांगितले. यावरून मधुमेहाविषयी समाजात असणारे गैरसमज आणि अज्ञान समोर आले आहे. त्यामुळे मधुमेहावर उपचारासाठी अनेकदा नको ते पर्याय निवडले जातात. हे टाळण्यासाठी आणि जनजागृतीसाठी माहिती पुस्तिका तयार केली असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)माहिती पुस्तिका मोफत उपलब्धमुंबईतील नायर, केईएम, सायन आणि जे. जे. रुग्णालयातील मार्डच्या कार्यालयात या माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध आहेत. मधुमेहाविषयी माहिती पुस्तिका मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे; पण मधुमेहाविषयी म्हणावी तितकी जनजागृती झालेली दिसून येत नाही. अजूनही मधुमेहाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अनेकदा चुकीचे पर्याय निवडले जातात. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये मधुमेहाविषयी जनजागृती करण्यासाठी ‘मार्ड’ने मधुमेहाविषयी माहिती पुस्तिका तयार केली आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेत ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. यात मधुमेह म्हणजे काय, कारणे, लक्षणे, उपचार आणि अन्य माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. मधुमेहाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सोप्या भाषेत माहिती देण्यात आल्याचे मार्डने सांगितले.
मधुमेहाविषयी अजूनही अनेक गैरसमज
By admin | Published: April 16, 2016 1:34 AM