मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेने इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाकाच लावला होता. त्यात काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचा सुद्धा समावेश होता. त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व आमदार प्रणिती शिंदे यांना सत्तधारी पक्षाकडून पक्षप्रवेशाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खुद्द प्रणिती यांनीच केला आहे. मतदारसंघातील संकल्पा सभेत त्या बोलत होत्या.
भाजप-शिवसेना पक्षात मोठ्याप्रमाणावर मेघा भरती झाली. तर अजूनही विरोधीपक्षातील अनेक नेते सत्तधारी पक्षाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आता प्रणिती शिंदे यांना सुद्धा सत्तधारी पक्षाकडून ऑफर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आमच्या पक्षात या म्हणून मला रोज आग्रह केला जात असल्याचे सुद्धा प्रणीता म्हणाल्या.
मी विचार केला तर किती वेळ लागणार जायला ? मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. जोपर्यंत जगू तोपर्यंत आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत. तसेच आम्ही इतर पक्षात गेलो तर हा जनेतेचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान असेल, असेही प्रणीता यावेळी म्हणाल्या. मात्र त्यांना कोणत्या पक्षाकडून ऑफर आल्या आहेत, याचा उल्लेख करण्याचे त्यांनी यावेळी टाळले.
आम्ही आमच्या लोकांशी प्रमाणिक आहोत. आजपर्यंत मतदारांनी आम्हाला साथ दिली आहे, ती फक्त आमच्या विचार आणि कामांमुळे. पक्ष सोडून जाणारी लोकं, त्यांना मोठ करणाऱ्या पक्षाची झाली नाहीत, ते जनतेचे काय होणार असा प्रश्न सुद्धा यावेळी प्रणीता शिंदे यांनी उपस्थित केला.तर यावेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा जोरदार टीका केल्या.