पंतप्रधानपदाची गरीमा आहे, पंजाबमध्ये जे घडले त्याचा आम्ही निषेधच करतो: नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:09 PM2022-01-07T18:09:04+5:302022-01-07T18:13:05+5:30
'पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचेल?'
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. दरम्यान, आज काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या मुद्द्यासह विविध विषयांवर भाष्य केले.
भाजप गरीमा घालवतंय
यावेळी नाना पटोले म्हणाले, मी आज सकाळी आणि परवाही बोललो की, पंतप्रधानपदाची एक गरीमा आहे. पंजाबमध्ये पंतप्रधानांसोबत घडले त्याचा आम्ही निषेधच करतो. पण, जो कार्यक्रम आधी ठरला होता, तो शेवटच्या क्षणी का बदलला हा प्रश्न आहे. या पंतप्रधान पदाची गरमी घालवण्याचे काम भाजपच करतंय. त्याविरोधात आम्ही बोलणार आणि त्यासाठी माझ्याविरुद्ध तक्रारी झाल्या तरी चालतील, असं पटोले म्हणाले.
ऐनवेळी मार्ग बदलणे चुकीचे
यावेळी पटोलेंनी केंद्रीय यंत्रणांवरही टीका केली. केंद्रीय सुरक्षा विभागाने पंतप्रधानांचा जो कार्यक्रम ठरवला होता, त्यावर कायम राहायला हवे होते. ठरलेला मार्ग ऐनवेळी बदलणे चुकीचे आहे. हा कार्यक्रम बदलणारी केंद्रीय तपास यंत्रणा आहे, आणि त्या दिवशी जे घडले, त्यालाही केंद्रीय सुरक्षा यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान ज्या रस्त्याने जाणार तिथे भाजपचे कार्यकर्ते कसे पोहचेल ? असा सवाल पटोलांनी केला.
निवडणूक आयोग निर्णय घेईल
यावेळी पटोलांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाने घेतली होती. मात्र, निवडणूक आयोगाने नगरपरिषदेच्या निवडणुका लावल्या. आता आणखी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. निवडणूक आयोग सर्वेसर्वा आहे, दिल्लीतून जसा इशारा होईल त्याप्रमाणे निवडणुका लागतील, असे ते म्हणाले.
रश्मी ठाकरेंना ट्रोल करणे लांछनास्पद
यावेळी नाना पटोलेंनी रश्मी ठाकरेंवर झालेल्या वादग्रस्त टीकेवरही भाष्य केले. अमृता फडणवीस यांना ट्रोल करणाऱ्यांना पकडले होते. महाराष्ट्रात महिलांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण काल रश्मी ठाकरे यांना ज्या पद्धतीने ट्रोल केले ते लांछनास्पद आहे. देवेंद्र फडणवीस नाशिकला गेले तेव्हा त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यावरही आम्ही कारवाई केली होती, असे ते म्हणाले.