मुंबई : राष्ट्रवादीच्या मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास विरोध दर्शविताना याच जिल्ह्यातील शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे.
मंत्रिमंडळातील समावेशासह रायगडचे पालकमंत्रिपद स्वत:ला मिळण्याबाबत गोगावले कमालीचे आक्रमक झाले आहेत. माझे मंत्रिपद कालपर्यंत १०० टक्के पक्के होते, आता एकशेएक टक्के पक्के आहे, असे सांगून अदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास गोगावले यांनी तीव्र विरोध दर्शविला. ‘त्याच पालकमंत्री म्हणून चांगले काम करू शकतात का, असा सवाल करीत आम्ही काय वाईट काम करणार का? शेवटी महिला, पुरुषात काही फरक असतो. मला १५ वर्षांच्या आमदारकीचा अनुभव आहे,’ असे गोगावले म्हणाले. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंत्रिपदासाठी शिंदे गटातील आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जायला मागे-पुढे पाहणार नाहीत, असा टोला शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी हाणला.
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्ही कधीही आग्रही नव्हतो. जेव्हा एकत्रित काम करण्याचे ठरते त्यावेळी त्याची जाणीव मनात ठेवून काम करणे आवश्यक असते. याबाबतचा योग्य तो निर्णय मुख्यमंत्री आपल्या स्तरावर घेतील. - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार गट)
बायको विचारते तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला का? ‘तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आला का, असे आमदारांच्या बायका त्यांना विचारत आहेत,’ असा चिमटा शिंदे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी काढला. तीनचाकी सरकारचे काही सांगता येत नाही, असा चिमटा काढून त्यांनी अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास आमदारांचा विरोध असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे बच्चू कडू यांची समजूत काढतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.