काँग्रेस कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता: नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांना येणार 'अच्छे दिन'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:13 IST2025-02-20T14:11:00+5:302025-02-20T14:13:36+5:30
साध्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने काँग्रेसमध्येदेखील उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

काँग्रेस कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता: नव्या प्रदेशाध्यक्षांमुळे चर्चा; जुन्या कार्यकर्त्यांना येणार 'अच्छे दिन'!
Congress Harshwardhan Sapkal : प्रदेश काँग्रेसमधील फेरबदलांची अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. नाना पटोले यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. अखेरीस प्रदेशाध्यक्षपदी बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. १९९९ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तर त्यानंतर ते आमदारही झाले. त्यांच्यासारख्या साध्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याने काँग्रेसमध्येदेखील उत्साहाचे वातावरण दिसत आहे. नूतन प्रदेशाध्यक्ष नवीन कार्यकारिणी नियुक्त करणारच आहेत. परंतु, त्याचबरोबर सर्वच जिल्ह्यांच्या कार्यकारिणीदेखील नव्याने तयार करण्यात येणार आहेत.
काँग्रेस पक्षाने नूतन प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केल्याने आता प्रदेश कार्यकारिणीत बदल होईलच; परंतु नाशिक जिल्ह्यातदेखील अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्षांनी अगोदरच बरखास्त केली आहे आणि शहर कार्यकारिणीचे प्रमुख असलेले अॅड. आकाश छाजेड हेच प्रभारी आहेत.
नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान तत्कालीन जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाची भाषा केली होती. त्यामुळे त्यांना हटवून माजी आमदार अॅड. शिरीष कोतवाल यांना जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र त्यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली.
नाशिक शहर काँग्रेसचे यापूर्वीचे प्रभारी शहराध्यक्ष शरद आहेर हे तब्बल आठ वर्षे प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतर सुमारे एक-दीड वर्षापूर्वीच त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्यांच्याऐवजी अॅड. आकाश छाजेड यांची प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच, सुमारे दहा वर्षांपासून संघटनात्मक निवडणुका नसल्याने प्रभारी अध्यक्षांच्या भरवशावर कारभार सुरू आहे. त्यामुळेच नूतन अध्यक्षांकडून संघटनात्मक निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता असून, शहर आणि जिल्ह्याला नूतन कार्यकारिणी मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकांचे वेध
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपकडून ज्या पद्धतीने सभासद नोंदणीसह संघटनात्मक बैठका सुरू आहेत, त्या बघता काँग्रेस पक्षातही संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे.