मुंबई - महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची काहीच गरज नाही. मविआतील नेते एकमेकांना भेटत असतात तसेच ही भेट झाली आहे. याचा अर्थ आघाडीत बिघाडी आहे असा अर्थ जर कोण काढत असेल तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडीत सुसुत्रता आहे, आजही आमची सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होत असते. महाविकास आघाडी भक्कम आहे त्याची भिती विरोधी पक्षांना वाटत आहे म्हणूनच मविआची नागपूरची १६ तारखेची सभा होऊ नये म्हणून भाजपा त्यांच्या एका आमदाराला पुढे करुन विरोध करत आहे. पण कोणी कितीही अडथळे आणले तरी महाविकास आघाडीची नागपुरातील वज्रमुठ सभा तर होणार आहे त्याचबरोबर अमरावती, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि मुंबई येथील सभाही होणार आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्या मुंबई भेटीसंदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, वेणुगोपाल हे मुंबईत येणार असल्याचा आमच्याकडे अजून कोणताही अधिकृत कार्यक्रम आलेला नाही परंतु ते मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असतीत तर त्यात वावगे काय? असेही पटोले म्हणाले.