मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपाची बोलणी सुरू झालीत. तर दुसरीकडे मनसेनेही मतदारसंघ निहाय आढावा घेत आहे. त्यातच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या वाढत्या भेटीमुळे शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचीमनसे एकत्र येणार का या चर्चेवर मनसे-शिवसेना यांची विचारधारा एकच आहे असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विचारधारेत फरक नाही. पण युती करायची की नाही किंवा विचारधारेत फरक नसला तरी राजकीय मतभेद असू शकतात. पण युती करायची की नाही यावर अंतिम निर्णय राज ठाकरे घेतील असं विधान त्यांनी केले आहे.
तर राजसाहेबांसोबत आमची भेट झाली नाही. परंतु आमच्या नेत्यांना आम्ही सांगितलंय. राज ठाकरे आपल्यासोबत आले तर दोघांचे विचार मिळतेजुळते आहेत. दोघेही आघाडीचे नेते आहेत.दोघेही मास लीडर आहेत. दोघेही एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही पक्षाला निश्चित होईल. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे आणि महाराष्ट्राला त्यांची ताकद दाखवावी अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
दरम्यान, याआधीही आमदार शिरसाट यांनी असेच विधान केले होते. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकरणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या काही चर्चा नाही. निवडणुकीत प्रत्येकाला प्रत्येकाची आवश्यकता भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे असं शिरसाट यांनी म्हटलं होतं.