मुंबई - मंत्रिपद मिळणार असताना एका आमदारानं धमकी दिली, जर त्यांना मंत्रिपद दिले तर मी राजीनामा देतो असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले. गोगावले यांच्या या गौप्यस्फोटानंतर शिवसेनेतील पक्षातंर्गत वाद चव्हाट्यावर आला. धमकी देणारा तो आमदार कोण अशी चर्चा सुरू झाली. त्यात माझ्यात आणि भरत गोगावले यांच्यात कुठलाही वाद नाही असा दावा करत शिरसाट यांनी यावर भाष्य केले.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, भरत गोगावले यांचे विधान वेगळ्या अर्थाने वेगळ्या माणसासाठी होते. मला मंत्रिपद दिले नसते तर मी राजीनामा दिला नसता का? तो काळ वेगळा होता. सिडकोचे अध्यक्षपद आता आलंय. भरत गोगावले आणि माझ्यात कुठलाही वाद नाही. आम्ही दोघं पहिल्यापासून एकत्रित आहोत. आज भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतायेत. मी त्यांना शुभेच्छा दिल्यात आणि आज दुपारी आम्ही भेटतोय असं त्यांनी म्हटलं.
त्याशिवाय आमच्यात वाद नाहीत. भरत गोगावलेंच्या तोंडून कधीतरी काहीतरी निघते त्यातून बातमी होते पण भरतच्या मनात असं काही नसते, त्यामुळे आम्ही त्यावर जास्त लक्ष देत नाही. भरत गोगावले हे आमचे मित्र आहेत असंही आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
आधी विधान मग सारवासारव
ज्यावेळी मंत्रिपदाची वेळ आली, हे तुम्हाला समजणं गरजेचे आहे. साहेबांनी आम्हाला विचारलं, तेव्हा एकाने सांगितले जर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर मी १२ वाजता राजीनामा देतो त्यामुळे साहेबांनी कदाचित त्याला आता सिडकोचे अध्यक्ष बनवले. एक किस्सा तर असा आहे मला मंत्रिपद नाही भेटले तर माझी बायको आत्महत्या करेल असं एकाने सांगितले असं विधान भरत गोगावले यांनी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात विधान केले. मात्र हे विधान राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चर्चेत आल्यानंतर गोगावले यांनी पुन्हा सारवासारव केली.
पत्रकारांनी गोगावलेंना प्रश्न विचारला असता, काही गोष्टी उघड करायच्या नसतात. खासगीत भेटल्यावर तुम्हाला ते सांगतो, आम्ही कधी खोट बोलत नाही. जी वस्तूस्थिती बोलतो, आता आम्ही ते बोललो तर तुम्ही टीव्ही चॅनेलवर तेवढेच दाखवणार, आम्ही एवढे बोलले तर दाखवणार नाही. मंत्रिपदासाठी स्पर्धा होतीच, मंत्रिपदे किती आणि कुणाकुणाला देणार, आम्ही काही समंजदार मंडळी थांबलो, त्यामुळे आमचे काही नुकसान झाले नाही. सगळ्यात जास्त निधी आणण्याचं काम आम्ही केले असं भरत गोगावलेंनी म्हटलं.