"राष्ट्रवादीत फूट नाही, अजितदादांसोबत शरद पवार येऊन महायुती मजबूत करतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 01:14 PM2023-08-14T13:14:33+5:302023-08-14T13:16:29+5:30
अजित पवार-शरद पवार भेटीतून काय समजावं हे कळत नाही असंही बच्चू कडू म्हणाले.
मुंबई – एकंदरीत चित्र पाहिले तर राष्ट्रवादी पक्षच संभ्रमात आहे. अजित पवार फुटल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे तसा झाला नाही. शरद पवारांचे सगळीकडे फोटो आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासारखेच आहे. कदाचित शरद पवार हे सुद्धा अजित पवारांसोबत येऊन महायुती आणखी मजबूत करतील असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे.
बच्चू कडू म्हणाले की, शरद पवारांचे बोलणे आणि प्रत्यक्षात कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाहीत असा त्यांचा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे. अजित पवार-शरद पवार भेटीतून काय समजावं हे कळत नाही. राष्ट्रवादीत सध्या कुठेही फूट नाही. एक दिसणारा गट तर एक न दिसणारा गट आहे तसेच जे चित्र पाहतोय त्यात मागे म्हटल्याप्रमाणे विरोधी बाकांवरही सत्तेतल्या माणसांना बसावे लागेल असंही बच्चू कडू यांनी सांगितले.
दोषींवर फौजदारी खटले दाखल करावे
मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी गेल्या १ वर्षात सर्वाधिक निधी दिला आहे. ठाण्यातील जो प्रकार आहे त्यात जे दोषी असतील त्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी पण फौजदारी खटलेही दाखल करावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाला त्यावर पत्रकारांनी बच्चू कडू यांना प्रश्न विचारला होता.
२०२४ पर्यंत नेतृत्व बदल नाही
सातत्याने राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत. त्यात एकनाथ शिंदे आजारी असल्याने त्यांच्या मूळ गावी गेले यावर बच्चू कडूंना विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताप १०३ पर्यंत गेला होता. एकसारखी धावपळ यातून हे आजारपण आले असावे. नेतृत्व बदलासाठी आजारपणाचे सोंग घेण्याची गरज नाही. २०२४ पर्यंत कुठल्याही प्रकारचा नेतृत्व बदल होणार नाही. झाला तर ते महागात पडल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.