एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिंदेगट आणि भाजपाचं सरकार स्थापन होऊन वर्ष उलटलं तरी मंत्रिपदाची आशा बाळगून बसलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक इच्छुक आमदार अस्वस्थ आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर शिंदे गटातील अस्वस्थता कमालीची वाटली आहे. दरम्यान, शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्ष आमदाराने या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या केवळ तारीख पे तारीख हेच सुरू आहे. असं विधान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष जयस्वाल म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याबाबत मी कुठलीही भविष्यवाणी करू शकत नाही. सध्या केवळ तारीख पे तारीखच सुरू आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना आता खूप कमी अवधी उरला आहे. या निवडणुकांआधी आचारसंहिताही लागू होणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींबरोबरच केंद्रीय कॅबिनेटमध्येही फेरबदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत आमचे वरिष्ठच अधिक सांगू शकतात.
आशिष जयस्वाल हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करणाऱ्या पहिल्या काही आमदारांपैकी एक आमदार होते. यावेळी अजित पवार यांच्या सरकारमध्ये झालेल्या समावेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही चांगले प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारांना त्यांची क्षमता आणि कामगिरीच्या आधारावर मंत्रिपद दिलं पाहिजे. तसेच प्रादेशिक संतुलन कायम राहिलं पाहिजे. तसेच इतर समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारांनाही कसे सामावून घेता येईल, याचाही विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.