Ramesh Chennithala: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपली. ही मुदत संपताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला. मात्र अनेक ठिकाणी जागेवरुन घटक पक्षांमध्ये आधी आणि नंतर चर्चा झाली. मात्र तरीही प्रश्न न सुटल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीने २८८ उमेदवार जाहीर केले असले तरी अनेक ठिकाणी घटक पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी एबी फॉर्म दिलेल्या उमेदवारांनी आपले उमेदरवारी अर्ज दाखल केले. मात्र तरीही मित्रपक्षातील इच्छुकांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देत उमेदवारी अर्ज भरले. त्यामुळे अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे म्हटलं जात आहे. या लढती रोखण्यासाठी आता महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं म्हटलं आहे. उमेदवारांनी भरलेले अर्ज ४ तारखेपर्यंत मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असेही चेन्नीथला यांनी बजावले आहे. "ज्या उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत त्यांनाच आम्ही 'एबी' फॉर्म दिले आहेत. ज्या काँग्रेस नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत त्यांनी अर्ज मागे घ्यावेत," असे रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
मैत्रीपूर्ण लढतीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं आहे. "आमच्या ९६ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. काँग्रेसने पण आमच्यापेक्षा दोन-तीन जागा जास्त भरलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील चांगले अर्ज भरले आहेत. आम्हाला एकत्र बसून लढायचे आणि जिंकाचे आहे. त्यानुसार आम्ही योग्य तो मार्ग काढू," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"कोणत्याही आघाडीमध्ये अशा घटना घडत असतात. निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या आधी आम्ही एकत्र बसू आमच्या प्रत्येक घटकाच्या उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्यांची आम्ही समजूत काढू. आम्हाला या राज्यात बदल घडवायचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहण्याची गरज आहे. २८८ जागा आघाडीमध्ये कोणालाच लढता येत नाही. ९० टक्के जागांवर आम्ही तिन्ही पक्षांची समजूत काढलेली आहे," असेही संजय राऊत म्हणाले.