मराठा आरक्षणाच्या रविवारच्या सरकारच्या तोडग्यावर संभ्रमावस्था पसरू लागली आहे. आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सरकार आरक्षण मिळण्यावर ठाम आहेत, तर विरोधक आणि कायदेतज्ञ यात फसवणूक झाल्याचे बोलत आहेत. जे इतर आरक्षणाच्या नियमांमध्ये आहे तिच आश्वासने मराठा आरक्षणाच्या मसुद्यात देण्यात आल्याचे विरोधक सांगत आहेत. आता कोल्हापूरच्या निवृत्त न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी मराठा आरक्षणाच्या जरांगेंनी मान्य केलेल्या मसुद्यावर मत मांडले आहे. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेतून मराठा समाजाच्या हाती काहीच पडलेले नाही. पंधरा दिवस वेट अँड वॉच भूमिका असेल. अनेकांना 16 फेब्रुवारीच का हा प्रश्न समाजाला पडणे साहजिक आहे. कारण जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तर यातून काहीही मिळणार नाही. उलट निवडणुकीत या अधिसूचनेचे भांडवल केले जाणार आहे, असे नलवडे यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाहीय, असेही नलवडे म्हणाले आहेत. याचबरोबर कोल्हापूरचा शाहू पुरस्कार मनोज जरांगे यांना देण्याची मागणी देखील नलवडे यांनी केली आहे.