मुंबई - भाजपात व्यक्तीस्वातंत्र्य नाही. तिथे बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. आम्ही सभा घेतो तेव्हा त्या सभेच्या दिवशी काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे सांगायला सकाळी ७ वाजता एक काळी टोपी आमच्या घरी येते. आणि ती काळी टोपी सांगते तेच आम्हाला बोलावं लागते. आमचे सगळं स्क्रिप्टेड असतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही कागद धरल्याशिवाय बोलत नाहीत. सोशल मीडियावर काय टाकायचं हेदेखील त्यांच्याकडून आलेले असते. फक्त बळी कोणाचा द्यायचा ते त्यांच्या हातात असते असा खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेल्या भाजपा नेते अद्वय हिरे यांनी केला आहे.
शिवसेना भवनात अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर अद्वय हिरे म्हणाले की, सातत्याने मी पक्षांतर करतो असं म्हटलं जाते. परंतु माझा ज्या माणसाला विरोध आहे तो माणूस पक्षांतर करतो म्हणून पक्षांतर करावं लागते. त्यांना स्थिर राहायला सांगा, मी कधीच शिवसेना सोडणार नाही. ते भाजपा युतीतून बाहेर गेले म्हणून मी भाजपात आलो. ते पुन्हा भाजपासोबत आले म्हणून मी काँग्रेसमध्ये गेलो. ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले म्हणून मी भाजपात परतलो. आता ते पुन्हा भाजपासोबत आले म्हणून मी शिवसेनेसोबत आलो. त्यांना परत इथे येऊन देऊ नका. म्हणजे आम्हाला कुठेही जायची गरज भासणार नाही असं सांगत अद्वय हिरे यांनी अप्रत्यक्षपणे दादा भूसेंना टोला लगावला.
त्याचसोबत आता आपले विरोधक त्यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे थोड्या दिवसांनी त्यांची भाषणे आणि पोस्ट कशा कंट्रोल होतात ते कळेल. जे जे काही झाले ते भाजपाची होती त्यातले विधाने माझी नव्हती याचा खुलासा याठिकाणी करतो. जेव्हा भाजपात गेलो तेव्हा सगळे लोक पक्ष सोडून गेले होते. तेव्हा अमरिश पटेल यांना पाडून लोकसभेला भाजपाला निवडून आले. असंख्य जणांना भाजपाच्या पदावर बसवले. परंतु ५० गद्दार भाजपाच्या मांडीवर बसल्याने पक्षाला आमची गरज राहिली नाही. माझ्या तालुक्यात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. त्यात जनआंदोलन झाले त्यात मी रस्त्यावर उतरले. भाजपा सरकार शेतकऱ्यांना वाचवायला उभे राहू शकले नाही. त्यामुळे जो पक्ष शेतकरी वाचवू शकत नाही त्या पक्षाचा त्याग करण्याचा निर्णय मी घेतला असं अद्वय हिरे यांनी सांगितले.
दरम्यान, कितीही खोके दिले तरी उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द मोडू शकत नाही. सत्ता आणि पैशासाठी बाप बदलणारी माझी औलाद नाही. उत्तर महाराष्ट्रात शिवसेना कशी उभी राहील आणि राज्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही काम करू. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर बसवल्याशिवाय हा कार्यकर्ता आता थांबणार नाही. शिवसेना संपतेय हा गैरसमज आहे. गद्दार गेलेत त्यांना जनता धडा शिकवणार आहेत. भाजपा नेत्यांची कुंचबना होतेय त्यातील अनेकजण शिवसेनेत येताना दिसतील असा दावा ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या अद्वय हिरे यांनी केला आहे.