वाशिम : शहरांतर्गत सर्वच रस्त्यांची पार दुरवस्था झाली असून जिकडेतिकडे खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. वाशिममध्ये २९ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींनाही त्याचा अनुभव आला. चारित्र्यसंपन्न आणि निडर अशी ओळख असलेल्या गडकरींनी मुद्दामहून त्यांच्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करून नगर पालिकेकडे खड्डे बुजवायला पैसे नाहीत म्हणे; विष खरेदी करायला आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या भाषणाची चित्रफित सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून पालिकेच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अकोला जिल्ह्यातून विभाजन होत वाशिमला १ जुलै १९९८ रोजी स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला. चालूवर्षी जिल्ह्याचे राैप्य महोत्सवी वर्षांत पदार्पण झाले आहे. असे असताना जिल्ह्याचे मुख्यालय म्हणून दर्जाप्राप्त वाशिम शहरातील रस्त्यांचे दारिद्रय मात्र अद्याप कायम आहे. गेल्या २५ वर्षांत शहरांतर्गत रस्त्यांची डागडूजी आणि नुतनीकरणाच्या कामांवर करोडो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र, मुळातच ‘कमिशन’बाजीत धन्यता मानून स्वहित जोपासण्याची वृत्ती बाळगलेल्या काही मंडळींमुळे कामे दर्जाहिन होवून अल्पावधीतच नव्याकोऱ्या रस्त्यांची वाट लागली. आज तर परिस्थिती इतकी खराब आहे की, एकही रस्ता धड राहिला नसून मुख्य रस्त्यांनी वाहन चालविताना नागरिकांच्या नाकीनऊ येत आहेत.
त्याचा अनुभव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही आला. पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्समध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख भाषणासाठी माईक हाती घेताच त्यांनी या विषयावर परखड शब्दात मत व्यक्त करून नगर पालिकेच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या भाषणाची चित्रफित सोशल मिडीयावरून प्रचंड व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.काय म्हणाले नितीन गडकरी?वाशिम शहरात हेलीकाॅप्टरमधून उतरल्यानंतर मी पाहिलेला रस्ता इतका घाणेरडा होता की बस ! लोक इकडेतिकडे पाहत होते, मला वाटले ते माझ्याकडे पाहत आहेत; पण ते माझ्याकडे पाहत नव्हते; तर खड्ड्यात पाय पडतो का, ते पाहत होते. मला पाटणी म्हणाले, नगर परिषदेकडे पैसे नाहीत. मी म्हटले, थोडं विष खरेदी करायला पैसे आहेत का? पाहून घ्या! नितीन गडकरींच्या या भाषणावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.