शिर्डी (अहिल्यानगर) : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात महायुतीशी थेट लढत असलेल्या महाविकास आघाडीची दाणादाण झाली. या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. दरम्यान, तिसरी आघाडी उघडलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसला. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला.
आता बच्चू कडूंनी पुढील राजकीय वाटचालीला सुरूवात केली आहे. बच्चू कडू यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे बच्चू कडू यांनी जनतेला प्रश्न विचारले असून, प्रहार जनशक्ती पक्षाने पुढील वाटचाल कोणत्या मार्गाने करावी, याबद्दल सूचना मागवल्या आहे. तसेच, बच्चू कडू घेणार राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळावा घेणार आहेत.
अशातच राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांना महायुतीमध्ये सामील होण्यास विरोध केला आहे. बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले. दिव्यांगाची धोरणं मान्य केली. त्यांच्याशी प्रतारणा करून बच्चू कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामील करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी, मुख्यमंत्रिपदाबाबतही त्यांनी भाष्य केले. माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणून. ते नाराज असण्याचे काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल, तो मी मान्य करील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणवीस यांनाच आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
झेंडा हाती घ्यावा की सेवेचा वसा सुरू ठेवावा? - बच्चू कडूपुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, या विषयी आपले मत काय? प्रहारचा सेवेचा झेंडा यावेळी खाली आला. पुढील काळात प्रहारने आपला राजकीय प्रवास कसा करावा, याविषयी आपले मत काय? सत्तेमध्ये सहभागी असावे की सत्तेबाहेर? धर्म-जात याचा झेंडा हाती घ्यावा की सेवेचा वसा सुरू ठेवावा?, असे प्रश्न बच्चू कडू यांनी विचारले असून, जनतेकडून याबद्दल सूचना मागवल्या आहेत.