मुंबई : भोंगे काढा असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात कुठेच म्हटले नाही. रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत भोंगे लावू नयेत, असा न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे परवानगी घेऊन, नियमानुसार लावलेले भोंगे उतरविण्याचा प्रश्नच येत नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शनिवारी स्पष्ट केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील भाषणात ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले की, हे असे इशारे सरकारने गांभीर्याने घेतले आहेत. मात्र, ज्या न्यायालयीन निर्णयाचा आधार घेत ही वक्तव्ये केली जात आहेत त्या निकालात भोंगे काढा असे कुठेच म्हटलेले नाही. रात्री दहा ते सकाळी सहा या काळात भोंगे लावू नयेत, असा निकाल आहे. त्यामुळे ज्या मंदिर, मस्जिद किंवा अन्य प्रार्थनास्थळांनी नियमानुसार परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत, तिथले भोंगे उतरवायचा प्रश्नच येत नाही. कोणी हे भोंगे उतरविण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशाराही गृहमंत्र्यांनी दिला.
महाआरती आणि हनुमान चालीसावरून सुरू असलेल्या वादंगावर गृहमंत्री म्हणाले की, ज्यांना हनुमान चालीसा, महाआरती वगैरे म्हणायचे आहे किंवा ज्याला जे जे करायचे आहे ते त्यांनी आपल्या घरात, तीर्थस्थानावर, आपापल्या मंदिर, मस्जिद आणि प्रार्थनास्थळी करावे. पण सध्या या गोष्टींचे विनाकारण राजकीय भांडवल करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही वळसे-पाटील यांनी केला. महाराष्ट्र पोलीस मुस्लीम संघटनांसोबत बोलणे करत आहेत. त्यांना भोंगे आणि आवाजासंदर्भातील जे नियम आहेत, त्यांची सविस्तर माहिती दिली जात आहे, असेही वळसे पाटील म्हणाले.
विजय अपेक्षितच होता -कोल्हापूर येथील पोटनिवडणुकीतील विजय अपेक्षितच होता. आणखी मोठा विजय होणे अपेक्षित होते. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक न लढविता धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. भाजपने केवळ धार्मिक भावना पुढे करत प्रचार केला. परंतु, त्यांना मतदारांनी नाकारले आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले.