Dr. Amol Kolhe: “यात काहीही लपवण्याचं कारण नाही...; नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरुन अमोल कोल्हे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 07:31 PM2022-01-20T19:31:29+5:302022-01-20T19:31:50+5:30
व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दोन्हीमध्ये गल्लत होऊ नये अशी भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली आहे.
मुंबई – महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी सध्या समोर आली आहे. राष्ट्रवादीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता नथुराम गोडसेंच्या भूमिकेतून पुढे येणार आहेत. अमोल कोल्हे यांनी साकारलेल्या छत्रपती शिवरायांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात बिंबलेली आहे. त्यातच राजकीय दृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे साकारणार असल्याने सगळ्यांची नजर या सिनेमाकडे असणार आहे.
बॉलिवूड प्रॉडक्ट या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस Why I Killed Gandhi या नावाचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्या सिनेमात नथुराम गोडसेच्या भूमिकेत खासदार डॉ. अमोल कोल्हे दिसत आहेत. त्यावरुन आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीतील काही नेत्यांनीच कोल्हे यांच्या सिनेमावर नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत काँग्रेस नेते हुसेन दलवाई म्हणाले की, अमोल कोल्हे यांनी गोडसेंची भूमिका टाळायला हवी होती. ज्या व्यक्तीने महात्मा गांधींचा खून केला ती भूमिका कशाला करायची? हे चूक आहे. भूमिका साकारताना ती किती छान भूमिका आहे तेही दाखवावं लागेल. अमोल कोल्हे कलाकार आहेत पण ते एका पक्षाचे खासदारही आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची विचारधारा घेऊन चालायला हवं अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
या सिनेमावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले की, आपण जी भूमिका साकारतो त्यातील प्रत्येक भूमिकेशी आपली सहमती असते. काही घटनांना १०० टक्के वैचारिक सहमती असते तर काही भूमिकांशी सहमती नसते ही साधी आणि सोपी गोष्ट आहे. २०१७ मध्ये या सिनेमात काम केले होते हा चित्रपट आता रिलीज होतोय. या मधल्या काळात बऱ्याच घटना घडल्या. मी नथुराम गोडसेंच्या उदात्तीकरणाची भूमिका कधीच घेतलेली नाही. कलाकार म्हणून मी या सिनेमात काम केले आहे. यामध्ये काहीही नाकारण्याचं किंवा लपवण्याचं कारण नाही असं मला प्रामाणिक वाटतं. व्यक्ती म्हणून मला विचार स्वातंत्र्य आहे आणि कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. दोन्हीमध्ये गल्लत होऊ नये असं त्यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले.