शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:53 IST2024-12-22T10:52:49+5:302024-12-22T10:53:48+5:30
आमच्या तिन्ही पक्षात कुठलाही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला पालकमंत्रिपद मिळावं, चांगली खाती मिळावे असं वाटत असते असं त्यांनी सांगितले.

शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले...
कोल्हापूर - कुठलेही खाते मोठे किंवा लहान नसते. शिवसेनेच्या कोट्यातली उत्पादन खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले असले तरी गृहनिर्माण सारखं खाते जे शहरी, ग्रामीण भागातील अत्यंत चांगले खाते आमच्याकडे आले आहे असं सांगत मंत्री शंभुराज देसाई यांनी खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे प्रत्येक कुटुंबाला, गरिबाला हक्काचं घर मिळालं पाहिजे हे गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेलं आहे. त्यामुळे जे खाते आहे ते तितक्याच तोलामोलाचं आहे. राज्यात पर्यटनाला खूप क्षमता आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा यासह राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. आता लोक पर्यटनाकडे वळायला लागली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून इकोनॉमी तयार होत आहे. या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम आम्हाला करायचं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच मी मुंबईला आलो. साहेबांनी येताना विमानात सांगितले आपल्याला चांगले काम करायचं आहे. तुमच्या पर्यटन विभागाला पुरेसा निधी देऊ. त्यामुळे निश्चित पर्यटन खात्यात चांगले काम होईल असंही पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आम्ही निवडून आल्यानंतर आमच्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. खातेवाटप झाले, विस्तार झाले. अधिवेशन कालच संपलंय. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री २ दिवसात मुंबईत बसतील त्यानंतर पालकमंत्रीही वाटप होईल. २३७ आमदारांचे महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आमच्या तिन्ही पक्षात कुठलाही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला पालकमंत्रिपद मिळावं, चांगली खाती मिळावे असं वाटत असते. पण आम्हाला जे काही मिळेल त्यात चांगले काम करून दाखवू असंही मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेवर आम्ही भगवा फडकवू
उबाठा बॅकफूटवर गेली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे घटनेने, कायद्याने नियमाने आमच्याकडे आहे. मागच्या निवडणुकीत लागलेला निकाल त्यामुळे उबाठा असेल किंवा अन्य दोघे मविआत एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. सभागृहात ५० चाही आकडा नाही. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका मांडायचे. महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. त्यांचं त्यांना लखलाभ, जशी एकतर्फी निकाल विधानसभेला लागला तसेच महायुतीचा भगवा झेंडा विधानसभेत तुम्हाला मुंबई महापालिकेवर फडकलेला दिसेल असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.