नाशिक - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांबाबत विविध बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. तर अजित पवार जर महायुतीत आले तर आनंदच आहे. आमची ताकद वाढेल असा दावा शिवसेना मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे. त्याचवेळी अजित पवारांना वजा केले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.
अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य; पहिल्यांदाच NCP आमदारानं दिलं जाहीर समर्थन
माणिकराव कोकाटे म्हणाले की, अजित पवार कुटुंबातील प्रमुख आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपत्ती आहेत. अजित पवारांना वजा केले तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नाही. कारण त्यांची काम करण्याची पद्धत, प्रशासकीय अनुभव आणि आमदारांना सांभाळण्याची क्षमता ही दुसऱ्या कुणालाही शक्य नाही. अजित पवारांनी वेगळा निर्णय घेतला तर काय होईल हे सांगता येणार नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवायचं असेल तर राष्ट्रवादीशिवाय भाजपाला पर्याय नाही. त्यांच्याकडे एकच मार्ग आहे. त्यामुळे त्यांच्यापरिने ते प्रयत्न करत आहेत. १६ आमदार अपात्र झाल्याने सरकार पडणार नाही. लोकसभेत महाराष्ट्रातून जास्त जागा जिंकून आणण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीकडे ताकद आहे. जर अजितदादा बाहेर पडले तर काही शिल्लक राहणार नाही. आमदार विश्वास टाकू शकतील असा एकही विश्वासू चेहरा सध्या राष्ट्रवादीत नाही हे सत्य आहे असं आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
अजित पवारांचा खुलासाखारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या, मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही असा खुलासा अजित पवारांनी केला आहे.