अजितदादांबरोबर गेलो कारण की...; राजकीय वर्तुळात वेगळीच कुजबुज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 09:01 AM2023-07-12T09:01:59+5:302023-07-12T09:02:20+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर, शरद पवार यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले माजी आमदार पप्पू कलानी यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली
अजित पवारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार त्यांच्याबरोबर जात आहेत. मात्र, हे आमदार अजित पवारांवरील प्रेमापोटी नव्हे, तर स्वतःच्या भल्यासाठी जात असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही आमदारांनी तर आधी अजित पवार, मग शरद पवार आणि पुन्हा अजित पवार असा प्रवास केलेला आहे. या आमदारांना अजितदादाही मतदारंसघातील आणि वैयक्तिक समस्या सोडवण्याचे आश्वासन देत आहेत. यात कुणाला साखर कारखान्यासाठी शासन हमीचे कर्ज हवे आहे, कुणाची बँक अडचणीत असल्याने बँकेला सरकारकडून मदत हवी आहे. वैयक्तिक लाभाच्या कारणासाठी आमदारांनी शरद पवारांची साथ सोडल्याची चर्चा त्यांच्या मतदारसंघात आहे.
टीम ओमी कलानी, हीच ओळख
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर, शरद पवार यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले माजी आमदार पप्पू कलानी यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. कलानी यांचा मुलगा ओमी यांच्या समर्थकांनी पुन्हा स्थानिक पक्ष टीम ओमी कलानी (टीओके) याचा धोशा सोशल मीडियावर लावला. कलानी कुटुंब नेमके कोणाच्या बाजूने, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कलानी कुटुंबाने शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत कलानी विरुद्ध आयलानी असा सामना रंगणार आहे. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत कलानी गेल्यास, ते उल्हासनगर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगतील. त्यामुळे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
विस्तार करा हो एकदाचा...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, हे शिंदे गटातील आमदार मागील वर्षभरापासून ऐकत- सांगत आहेत. त्यातही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले शिंदे गटाचे आमदार तर दर आठवड्याला जाहीरपणे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार, पुढील आठवड्यात नक्की होणार, असे मीडियासमोर जाहीरपणे सांगत आहेत. वारंवार मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलणाऱ्या या आमदारांचे आता हसे होऊ लागले आहे. त्यामुळे एकदा विस्तार उरकून टाका, अशी काकुळतीची भाषा ते पक्षश्रेष्ठींसमोर करत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.