मुंबई - अभिनेता अजय देवगन आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटातून महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र चित्रपटात महाराष्ट्राचा इतिहास दाखवण्यात आला असताना येथेच हा चित्रपट अद्याप टॅक्स फ्री झाला नाही. त्यामुळे सरकावर टीका करण्यात येत आहे. आज चित्रपट टॅक्स फ्री करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटाला करमुक्त करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने आधीच घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळात सादर करण्यात येणार आहे. यावर आज निर्णय होऊन चित्रपट टॅक्स फ्री होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे.
भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात आधीच तान्हाजी चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राचा इतिहास दाखवण्यात आला असताना चित्रपट राज्यात टॅक्स फ्री केला नसल्याने ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून महाराष्ट्रात हा चित्रपट सुस्साट सुरू आहे.