- शफी पठाण, पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)
विज्ञान आणि साहित्य ही दोन धु्रवांवरची दोन टोके आहेत, असे आधी बोलले जात असे. परंतु, आता चित्र बदलले आहे. विज्ञानाने मानवी जीवनावर साहित्यापेक्षाही जास्त प्रभाव पाडला आहे. त्यामुळे आता विज्ञानकथांंच्या माध्यमातून या क्षेत्रातील नवनवीन बदल वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लेखकांनी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ वैज्ञानिक जयंत नारळीकर यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील शं.ना. नवरे सभामंडपात शनिवारी त्यांचा व ज्येष्ठ चित्रकार बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या वेळी मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, स्वागताध्यक्ष गुलाबराव वझे, महामंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर भाले, कार्यवाह डॉ. इंद्रजित ओरके, डॉ. विलास चिंतामण देशपांडे उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते जयंत नारळीकर आणि बाळ ठाकूर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव, प्रसंग सांगितले. विज्ञानाच्या आडमार्गाने मी साहित्याच्या क्षेत्रात आलो. बऱ्याच विज्ञानकथा माझ्या नावावर असल्या, तरी मी आजही स्वत:ला या क्षेत्रात नवीन समजतो. आज विज्ञान, साहित्य ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे साहित्याने विज्ञानाला जवळ करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसरे सत्कारमूर्ती ठाकूर यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, मी माझ्या करिअरची सुरुवात कोकणातून केली. निसर्गचित्रांपेक्षा विविध स्वभावगुणांच्या माणसांची चित्रे आयुष्यभर रेखाटली. या कार्यक्रमाचे संचालन दीपाली केळकर, तर आभार डॉ. श्रीपाद जोशी यांनी मानले.