मुंबई : ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘फँड्री’ यासारख्या चित्रनाट्य कलाकृतींमुळे दलित वास्तवाचे माध्यमांतर झाले. तरी ते अपूर्ण असून ते चित्रकला, शिल्पकला, संगीत अशा सर्व कला प्रकारांत प्रतिबिंबित होतानाच ते आपल्या जाणीव-नेणिवेतही पाझरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.कवी लोकनाथ यशवंत आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना शनिवारी पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ुयावेळी मंजुळे बोलत होते. पाच हजार रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदाचे १८ वे वर्ष होते. ज्येष्ठ साहित्यिक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाहीर संभाजी भगत, लेखिका ऊर्मिला पवार, पत्रकार युवराज मोहिते आणि दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार व्यासपीठावर उपस्थित होते.कविता लहान कलाकृती आहे. पण तीच सर्वाधिक ज्वालाग्रही असते. मराठीत बहिणाबाई चौधरी महान कवयित्री असून, त्यांच्या काव्याचा आपल्यावर प्रभाव आहे. माझी कविता विदर्भातील आहे. मी अकरावी फेल आहे, मात्र राज्यातल्या सर्वच विद्यापीठांत माझी कविता अभ्यासली जात असून तिच्यावर चित्रपट, नाटक येत असल्याने माझ्या कवितेचेही माध्यमांतरच झाल्याचे कवी लोकनाथ यशवंत यांनी सांगितले.अध्यक्षीय मनोगतात लक्ष्मण गायकवाड म्हणाले, की ज्या वडार समाजाने आजवर येथे अनेक मंदिरे बांधली, देवाच्या मूर्ती घडवल्या, परंतु ‘फँड्री’सारख्या भेदक वास्तवतेने त्याच वडार समाजाचा नागराज मंजुळे ही दांभिकता फोडायला निघाला आहे.मला माझा मेसेज देता आला पाहिजे, अशी माझी कोणताही कलाप्रकार हाताळताना पूर्वअट असते अन्यथा मी त्या फंदात पडत नाही. त्यामुळेच मी मुळात शाहीर असूनही ‘शिवाजी अंडरग्राउंड’ किंवा ‘मुंबई १७’ अशा नाट्यकृती निर्माण करू शकल्याचे शाहीर संभाजी भगत म्हणाले.अख्ख्या देशाचा मालक अंबानी व्हावा़ तसे झाल्यास जाती, वर्ग संपुष्टात येतील. गरीब-श्रीमंत भेद मिटून जाईल. सारी माणसे एका रांगेत येतील, असा उपहासात्मक टोला लगावत गेल्या साठ वर्षांत भटक्या विमुक्तांच्या आर्थिक जीवनात काडीचेही माध्यमांतर झाले नसल्याचे साहित्यिक लक्ष्मण गायकवाड परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले. (प्रतिनिधी)
जाणीव-नेणिवेतही माध्यमांतर होणे गरजेचे
By admin | Published: September 22, 2014 2:30 AM