ठाणे : सण साजरे करण्यावरही निर्बंध आणण्याची पद्धत सुरू झाली आहे. याला आळा घालून हिंदूंचे सण वाचवण्यासाठी लोकसभेत बिल आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या व्यासपीठावर पत्रकारांशी बोलताना केले. तर पोलिसांनी गोंविदा पथकांवर गुन्हे दाखल करू नयेत, यासाठी पंतप्रधानाना विनंती करणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले.येथील भवानी चौकात टेंभीनाका मित्र मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात हजर राहून त्यांनी गोविंदा पथकांचे स्वागत करून त्यांच्या सलामीचा स्वीकार केला. दरवर्षाप्रमाणे उत्सव साजरा केला जात आहे. हिंदूचे सण वाचवण्यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनास विनंती करून लोकसभेत बिल आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सन्मान व पालन करून हा उत्सव साजरा केला जात आहे. या उत्सवानिमित्त पूर्वीही जीवघेणी स्पर्धा नव्हती व आजही नाही. उत्सव हा उत्सव असून त्यानुसार तो साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. टेंभीनाका मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या या दहीहंडीला राज्यमंत्री गुलाब पाटील यांनी भेट दिली. टेंभीनाक्याची दहीहंडी ही ठाण्यातील मानाची हंडी म्हणून प्रसिद्ध आहे. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या दहीहंडीसाठी शिंदे यांच्याकडून दरवर्षी परिश्रम घेतले जातात. या उत्सवासाठी थर लावण्याच्या निर्बंधामुळे नाराज झालेल्या ठाणे येथील शिवतेज महिला गोविंदा पथकाने या दहीहंडीला झोपून सात थर लावले आणि नंतर पाच थरांची सलामी या वेळी दिली. येथे आलेल्या गोविंदा पथकांनी पाच थरांची सलामी देत हा आनंदोत्सव साजरा केला. टेंभीनाक्याजवळून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांभळीनाक्यावरील दहीहंडीलादेखील येथील गोविंदा पथकांनी भेट दिली. खासदार राजन विचारे यांच्या आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या या दहीहंडीला मात्र गोविंदा पथकांनी केवळ चार थरांची सलामी दिली. या दोन्ही दहीहंड्यांना भेट देऊन सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांमध्ये शिवतेज महिला गोविंदा पथकांसह येथील श्री गौरीशंकर सिद्धिविनायक, कापूरबावडीचा राजा, आम्ही डोंगरीकर आणि सह्याद्री गोविंदा पथक आणि नालासोपारा येथील श्रीगणेश बाल मित्र मंडळ आदी गोविंदा पथकांचा समावेश होता. टेंभीनाका व व जांभळीनाका दोन्ही ठिकाणी लावलेल्या थरांसाठी सेफ्टीबेल्टचा वापर केल्याने कोणालाही दुखापत झाली नाही.>पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करू नये - विचारे न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून हा दहीहंडी उत्सव साजरा केला जात आहे. हा सण साजरा होत असताना उत्सवाच्या भरात छोट्यामोठ्या चुका होऊ शकतात. त्यांची या वर्षी गांभीर्याने दखल न घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करणार असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. पुढील वर्षापासून पारंपरिक पद्धतीनेच सण साजरे केले जातील. राजकारण्यांवर एरवी गुन्हे दाखल होतात. आता मात्र सण साजरे करणाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल होणे योग्य नाही. त्यांना एक संधी द्यायला हवी, असे विचारे यांनी या वेळी स्पष्ट केले.
हिंदू सण वाचविण्यासाठी विधेयक हवे
By admin | Published: August 26, 2016 4:51 AM