ऑनलाइन लोकमत
सोनई, दि. ११ - शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी इतिहासात पहिल्यांदाच महिलेची निवड झाल्यानंतर तरी शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश मिळेल अशी अपेक्षा सर्वसामान्य महिलांकडून व्यक्त होत आहे. मात्र 'शनीच्या चौथ-यावर महिलांना प्रवेश वर्ज्यच असेल असे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिता शेटे यांनी स्पष्ट केल्याने महिलांना समानतेची वागणूक मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे.संस्थानाची परंपरा यापुढेही चालूच राहिल, असे शेटे यांनी स्पष्ट केल्याने महिला भाविकांची निराशा झाली आहे.
आम्ही महिलांना चौथऱ्यावर प्रवेश घेऊच देणार नाही, अशी भूमिका शेटे यांनी घेतली. जर अध्यक्षपदी महिला चालते, तर दर्शनासाठी महिला का चालत नाही, असा प्रश्न विचारला असता, पूर्वापारपासून शनीदेवावर महिलेची सावलीही पडता कामा नये, असं म्हटलं जात असल्याने चौथऱ्यावर प्रवेश दिला जाणार नाही, असं अनिता शेटे यांनी सांगितलं.www.lokmat.com/storypage.php
काही महिन्यांपूर्वी एका महिलेने शनीच्या चौथ-यावर प्रवेश करून शनी देवाला तेलाचा अभिषेक केल्यानंतर मोठा गदारोळ माजला, शुद्धीकरणासाठी गावक-यांनी देवाला दुग्धाभिषेक घातल्याची घटनाही घडली. तसेच त्या मंदिरातील सुरक्षा रक्षकांनाही निलंबित करण्यातल आले. या सर्व प्रकारामुळे मोठा गदारोळ माजला होता. गावक-यांनी या घटनेचा निषेध केला होता. बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही या प्रवेशबंदीचे समर्थन केल्याने महिलांनी संताप व्यक्त केला होता.
दरम्यान आज देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची निवड झाली, त्यानंतर तरी हे चित्र पालटेल अशा अपेक्षा महिलांना होती. मात्र नवनिर्वाचित अध्यक्ष अनिता शेटेंनी चौथ-यावर महिलांना प्रवेश वर्ज्यच असेल असे सांगत त्यांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरवले.