मुंबई : कोरोनाकाळातून राज्य बाहेर येत असताना यंदाच्या दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर कोणतीही बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे. मात्र, कोरोनाने आजारी झालेल्या किंवा कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषणाचा त्रास होण्याची भीती असल्याने यंदा फटाके फोडण्याचे टाळावे, असे आवाहन दिवाळीनिमित्त जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारने केले आहे.
‘ब्रेक द चेन’अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन दिवाळी साजरी करताना करावे, दिवाळी घरगुती स्वरूपात साजरी करावी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दिवाळी खरेदीसाठी ठिकठिकाणी बाजारांमध्ये असलेली दुकाने व रस्त्यांवर होणारी गर्दी शक्यतो टाळावी.
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. मास्कचा वापर करावा व सामाजिक अंतर पाळावे. दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करताना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. संबंधित कार्यक्रम शक्यतो ऑनलाइन घ्यावेत, असे आवाहनही सरकारने केले आहे.