मुंबई - मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सार्वजनिक वक्तव्य किंवा ट्विट करण्यास सरसकट मनाई करणारा अंतरिम आदेश देण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. सकृद्दर्शनी नवाब मलिक यांनी केलेले ट्विट्स हे द्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आले. तथापि, वानखेडे हे सरकारी अधिकारी आहेत आणि नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात केलेले ट्विट हे एनसीबी विभागीय संचालकाच्या सार्वजनिक कर्तव्यांशी निगडीत आहे. त्यामुळे मंत्र्यांना वानखेडे यांच्याविरोधात बोलण्यास पूर्णपणे मनाई करू शकत नाही, असे न्या. माधव जामदार यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले. वानखेडे यांना खासगीपणाचा अधिकार असला तरी मलिक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. त्यामुळे मंत्र्यांनी यापुढे वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असे न्या. जामदार यांनी म्हटले.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून नुकसानभरपाई म्हणून १.२५ कोटी रुपयेही देण्याची विनंती दाव्यात केली आहे. मानहानी दाव्यावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात आणखी बदनामीकारक वक्तव्ये करण्यास व समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास मलिक यांना मनाई करावी, अशी अंतरिम मागणी ज्ञानदेव वानखेडे यांनी केली होती. या बाबत आदेश देताना न्यायालयाने वानखेडे यांना दिलासा देण्यास नकार दिला.
बोलण्याचा मला मूलभूत अधिकार सत्यमेव जयते. बोलण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अन्यायाविरुद्ध लढाई सुरूच राहील.- नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री
‘आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न’ -- मंत्री नवाब मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजापाठ करतानाचे फोटो समोर आले. तसेच आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे वानखेडे कुटुंबीयातील एका सदस्याने स्पष्टीकरण दिले.
- मलिक यांनी मध्यरात्रीच्या सुमारास वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत त्याखाली कबूल है, ..कबूल है .. कबूल है..यह क्या किया तूने? असे नमूद केले. या फोटोमध्ये वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसतात. - मलिक यांनी वानखेडे यांचा पहिल्या लग्नातला फोटो शेअर करताच, वानखेडे यांचे दुसऱ्या पत्नीसोबत हिंदू पद्धतीने केलेल्या विवाहासहित पूजापाठ करतानाचे फोटो समोर आले. आईसाठी मुस्लीम पद्धतीने लग्न केले असून, आम्ही धर्मनिरपेक्ष भावनेचे पालन करतो, असे कुटुंबीयातील एका सदस्याने स्पष्ट केले.