'देशाची माफी मागायला सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहू्र्त मिळणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 04:12 PM2021-05-28T16:12:23+5:302021-05-28T16:13:26+5:30
खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींना लक्ष्य केलंय.
मुंबई - देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर अद्याप धोका कायमच आहे. त्यामुळे, देशातील अनेक राज्यात अ्दयापही लॉकडाऊन असून जनजीवन पूर्ववत होण्यास अवधी लागणार आहे. त्यातच, गृहमंत्रालयाने 30 जून पर्यंत लॉकडाऊनबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे सूचवले आहे. कोरोनाच्या या सर्व मुद्द्यांबाबत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मोदींना लक्ष्य केलंय.
देशात आज स्वातंत्र्यवीर. वि.दा. सावरकर यांची 138 जयंती साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत दिग्गज नेत्यांनी सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे. मात्र, आजच्या जयंतीदिनाचा उल्लेख करत नितीन राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. देशातील कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही, असे ट्विट करत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल मा. पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) May 28, 2021
अंदमानच्या तुरुंगात कैद असताना सावरकर यांनी इंग्रजांना माफीचं पत्र लिहिलं होतं, असं सांगण्यात येतं. यापूर्वी राहुल गांधींनी जाहीर सभेत या माफीचा उल्लेख केला होता. मंत्री नितीन राऊत यांनी हाच धागा पकडत मोदींवर निशाणा साधला आहे.
दुसऱ्या लाटेला मोदींची नौटंकीच कारणीभूत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये, कोरोना, लॉकडाऊन, उपाययोजना आणि नागरिकांच्या समस्यांसंदर्भात भाष्य केले. यावेळी, केंद्र सरकार कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोपही राहुल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नौटंकी हेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं प्रमुख कारण आहे. अद्यापही त्यांनी कोरोनाला समजून घेतलं नाही. देशातील कोरोना मृत्यूदराची आकडेवारी खोटी असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. तसेच, सरकारने खरी आकडेवारी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.