वसंत भोईर/ लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : नोटबंदीच्या दणक्यानंतर सावरणाऱ्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील सहकारी बॅँकाची परवड अजून सुरुच असून शेतकऱ्यांच्या मित्र ठरणाऱ्या या बॅँकाना पतपुरवठा होत नसल्याने नविन कर्जासाठी बळीराजाला खेटे मारावे लागत आहेत. गत दोन महिन्याच्या काळामध्ये अनेकांनी उसनवाऱ्या करुन जूने कर्ज फेडून नवे मिळेल या आशेने धडपड सुरु केली असली तरी मुळात सहकारी बॅँकाना नोटबंदीची झळ अजूनही बसत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.जिल्ह्यातील सहकारी बॅँकाना मागणीनुसार पैसा पुरवला जात नसल्याने पैशाअभावी बॅँकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांची मात्र मोठी परवड झाली आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक एकमेव सामान्य शेतकऱ्यांची आधार आहे. मात्र, गत दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी आपली जुनी सहकारी सोसायटीची देणी नवीन कर्ज मिळेल या आशेवर दागिने तारण ठेवून तर कुणी जवळची बचतीची पूंजी काढून भरणा केला. त्यातून केवळ कुडूस शाखेतच सहा कोटींवर रक्कम भरणा झाली. शेतकऱ्यांची सहकारी सोसायटीची कर्ज संपूर्ण भरली गेली. मात्र, त्या दृष्टीने सहकारी बॅँकाना पतपुरवठा होत नसल्याने शेतकरी बॅँकेत खेटा घालून हातावर हात ठेवून आहेत. गौरूनाथ खिसमतराव या निवृत्त शिक्षकांनी सांगितले की, माझ्या खात्यामध्ये भावाच्या मुलाच्या लग्नासाठी पैसे ठेवले आहेत. लग्न दोन दिवसावर आहे आणि मी चार दिवस फेऱ्या मारूनही माझेच पैसे मला मिळालेले नाहीत. तर शेतकरी वसंत भोईर यांनी दागिने तारण ठेवून सोसायटीचे देणे फेडले असतांना. नवीन सोसायटी मिळेल अशी आशा होती. मात्र गेले दोन महिने होऊनही सोसायटीची पाटी कोरीच आहे. हे असेच चालत राहिले तर एका महिन्यावर आलेला शेतीचा हंगाम वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा बॅँकेवरील विश्वासाला तडाया बाबत एका शेतकऱ्यांनी सांगितले, कॉग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यात जिल्हा बॅँकेतील व्यवहार कधीच एवढे ठप्प झाले नाहीत. हे सरकार जिल्हा बॅँकेची कोंडी करीत आहे. परिणामी शेतकरी, कर्मचारी, बचत गट, शालेय व्यवहार अडकले आहेत. सामान्य माणसाचा जिल्हा बॅँकेवर विश्वास कमी होत आहे. शेतकरी, कामगार यांनी राष्ट्रीय बॅँकेत खाते उघडण्यासाठी पसंती दिली आहे.
सहकारी बॅँकेमध्ये नोटाबंदीची झळ कायम
By admin | Published: May 06, 2017 5:20 AM