यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर-मुंबई या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गात उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही नवनगरांच्या (टाऊनशिप, कृषी समृद्धी केंद्र) आधी निश्चित केलेल्या स्थानांमध्ये कोणताही बदल न करण्याची भूमिका राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतली आहे. तीन नवनगरांच्या जागांची अधिसूचना नगरविकास विभागाने आज काढली. समृद्धी महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, ठाणे जिल्ह्यातील नवनगराची जागा बदलली जाईल, असे चित्र निर्माण करण्यात आले होते. तथापि, मौजे नाडगाव, पितांबरे, चिंचवली, उटणे आणि आंबिवली, वासुंद्री या गावांना ंमिळून एका नवनगराची निर्मिती केली जाईल. समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर केवळ सहा तासांत कापता येणार आहे. या महामार्गावर कृषी प्रक्रिया उद्योगांची आणि एकूणच कृषी समृद्धीसाठीच्या आवश्यक बाबींचा समावेश असलेली नवनगरे निर्माण करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. स्थानिक कृषी मालावर त्याच ठिकाणी प्रक्रिया करून अवघ्या काही तासांत तयार माल मुंबई वा मुंबईमार्गे जगात पोहोचविणे त्यामुळे शक्य होणार आहे. या महामार्गाची उभारणी राज्य सस्ते विकास महामंडळ करणार असून, त्यांनाच नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या नवनगरामध्ये मुंडमाळी (अंशत: क्षेत्र), मुंड निशंकराव (अंशत: क्षेत्र), मुंड हिंदुराव (अंशत: क्षेत्र), शिवनी, रसूलपूर (अंशत: क्षेत्र) आणि गवनेर तळेगाव (अंशत: क्षेत्र) या गावांचा समावेश असेल. औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यातील काही गावे मिळून एका नवनगराची उभारणी करण्यात येणार आहे. त्यात वैजापूर तालुक्यातील बाबतारा (अंशत: क्षेत्र), लाखगंगा (अंशत: क्षेत्र) आणि पुरणगाव (अंशत: क्षेत्र) तर कोपरगाव तालुक्यातील धोत्रे (अशंत: क्षेत्र) या गावांचा समावेश असेल. तिन्ही नवनगरांसंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमान्वये जागावापराच्या बदलास नगरविकास विभागाने संमती दिली आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना तीस दिवसांच्या आत संबंधित विभागाकडे नोंदविता येणार आहेत. समृद्धी महामार्गात नवनगरांच्या जागा या विचारपूर्वक आणि त्या भागातील विकासाला अत्यंत पूरक ठरतील अशा पद्धतीने निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यात बदल केला जाणार नाही. - राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळ.
‘समृद्धी’तील ‘टाऊनशिप’मध्ये बदल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:42 AM