मुंबई : मेधा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स किंवा मुंबई व परिसरातील झोपडपट्टी पुनर्विकासाच्या (एसआरए) कोणत्याही प्रकल्पाचा आपला वा आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याचा संबंध नसल्याचा खुलासा भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.प्रदेश भाजपाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपली बदनामी करण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सांताक्रुझमधील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पाशी आपला काहीएक संबंध नाही. या प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या मेधा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीशी आपल्या पत्नीचा काहीही संबंध नाही, असे खा. सोमय्या यांनी म्हटले आहे.सोमय्या यांनी पत्नीच्या नावे असलेल्या ‘मेधा बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स’मधून सांताक्रुझ येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) लाटला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी केला होता.झोपडपट्टीवर कारवाईदरम्यान, सांताक्रुझच्या कलिनामधील स्वामी विवेकानंद एसआरए प्रकल्पातील १० झोपड्या सोमवारी पाडण्यात आल्या. १३ वर्षांपासून येथील रहिवासी पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. या प्रकल्पाचे नेमके विकासक कोण? या संभ्रमात सध्या रहिवासी आहेत. त्यात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक घरांवर बुलडोझर फिरल्याने स्थानिकांची सामान हलविण्यासाठी पळापळ सुरू होती. पार्वती (८०) व विश्राम लोखंडे (९०) यांचे कुटुंबही रस्त्यावर आले. लोखंडे कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ही खोली विकत घेतली होती. (विशेष प्रतिनिधी)
‘मेधा बिल्डर्स’शी संबंध नाही
By admin | Published: May 17, 2016 5:31 AM