पुणे : सामाजिक, सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या महामंडळात कायम वाद होत गेले. त्यामुळे सामान्य लोकांच्या लेखी महामंडळाची प्रतिमा ही मलिन झाली. वर्षात तीन साहित्य संमेलने भरवणे, एवढेच काम साहित्य महामंडळाचे उरले आहे. गणेशोत्सव व उरसाप्रमाणे ही संमेलने भरवली जात असून, ती संस्कृतीची गरज झाली आहे, अशी टीका महामंडळाच्या आजवरच्या कार्यपद्धतीवर करीत धनदांडगे आणि राजसत्ता यांच्यामुळे संमेलनावर महामंडळाचे नियंत्रण उरले नसल्याचे परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त डॉ. जोशी यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.डॉ. जोशी म्हणाले, ‘‘शक्यतो दर वर्षी संमेलन घेण्यात यावे, असे महामंडळाच्या घटनेत म्हटले आहे. याचा अर्थ असा नव्हे, की दर वर्षी संमेलन भरवायला हवे. पण, धनदांडगे आणि राजसत्ता यांच्या हितसंबंधांमुळे संमेलने भरवली जात असून, ती पश्चिम महाराष्ट्र व शहरांपुरती राहिली आहेत. ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात करून खाण्याची आपली पद्धत असून, त्यातच आनंद मानला जात आहे. मात्र, ‘दर वर्षी संमेलन नको,’ ही माझी भूमिका आहे; पण माझी एकट्याची भूमिका महामंडळाची असू शकत नाही. मी माझ्या मतावर ठाम आहे. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीताराजे पवार यांनी आभार मानले. >थोरामोठ्या साहित्यिकांच्या पुण्याईने साहित्य महामंडळ स्थापन झाले. त्यांनी साहित्याशी बांधिलकी जपली. अखंड साहित्यनिष्ठा ठेवल्याने तेव्हाच्या काळात अनुदान नसतानादेखील साहित्य महामंडळाचा कारभार व्यवस्थित सुरू होता. आता संमेलनांचा वाढता भोंदू आणि भोंगळपणा, सेवाभावी कार्यकर्त्यांची वानवा यांमुळे टीकेच्या केंद्रस्थानी साहित्य महामंडळ राहिले आहे.- श्रीपाद जोशी
संमेलनावर नियंत्रण नाही
By admin | Published: June 11, 2016 1:10 AM