मुंबई - राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते, दरम्यान, राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेमध्ये एक पैशाचाही घोटाळा केलेला नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. तसेच या प्रकरणाशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले. ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, शिखर बँकेत एका पैशाचाही घोटाळा केलेला नाही. या प्रकरणात आम्हाला आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आलेली नाही. 12 ते 13 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेत 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार होईल का? तसेच जर घोटाळा झाला असता तर आज 250 ते 300 कोटींचा नफा कमवू शकली असती का? असा सवाल अजित पवार यांनी केला. या बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शेकाप यांचेही संचालक आहेत. मात्र गुन्हे दाखल झाल्यानंतर केवळ शरद पवार आणि अजित पवार यांची नावे पुढे केली गेली, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.नेमका काय आहे आरोप?राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बॅँकेचे नेतृत्व करीत असलेल्या राज्य सहकारी बॅँकेत २००५ ते २०१० या काळात कर्ज वाटपात २५ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा ठपका ‘नाबार्ड’च्या अहवालात ठेवण्यात आला आहे. तारण न घेता सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांना बेकायदेशीर कर्ज वाटप, वसुलीमध्ये टाळाटाळ, दिवाळखोरीत निघालेले कारखाने, गिरण्यांच्या खरेदीमध्ये अनियमितता बाळगल्याचा ठपका तत्कालीन संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे.
शरद पवार कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार?मध्यवर्ती शिखर बॅँकेच्या संचालक मंडळात शरद पवार नसले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली बॅँकेचा कारभार सुरू होता, असा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. त्यामुळे त्यांचा मुख्य सूत्रधारांमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आवश्यकतेनुसार याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याविरुद्ध नोटीस बजावून चौकशीला बोलावण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.