मुंबई: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मनसेनंमुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी सरकारी निर्बंधांना फाट्यावर मारत दहीहंडीचं आयोजन केलं. यानंतर आता या दहीहंडी आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यावरुन मनसेचे सरचीटणीस संदीप देशपांडे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? नारायण राणेंविरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या शिवसैनिकांबाबत मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? असा सवालच संदीप देशपांडेंनी केला. तसेच, सरकारवर दुट्टपी वागण्याचा आरोपही केला.
देशात इंग्रज होते तेव्हा रँड नावाचा अधिकारी होता. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला, तशीच वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो… हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, असं ते म्हणाले. तसेच, मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यावर राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही आंदोलन करू, असा इशाराही देशपांडेंनी दिला.