पुणे : कोरेगाव भीमा दंगलीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील दलित व मराठा समाजातील नेत्यांनी एकत्रित येत दलित-मराठा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही धर्मांध शक्तींकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापार्श्वभुमीवर लवकरच पुण्यात मराठा-दलित सामाजिक सलोखा परिषद घेणार असल्याचे या नेत्यांनी सांगितले.
विविध दलित संघटना, मराठा संघटना व राजकीय पक्षांमधील दलित-मराठा नेत्यांनी एकत्रितपणे बैठक घेतली. याबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आमदार शरद रणपिसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, मराठा क्रांती मोर्चाचे शांताराम कुंजीर, प्रविण गायकवाड, महेंद्र कांबळे, हणमंत मोटे, कैलास पाठारे, बाळासाहेब अमराळे, राहुल डंबाळे, रोहिदास गायकवाड, प्रभाकर दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.
बागवे म्हणाले, कोरेगाव भीमा दंगलीनंतर मराठा विरूध्द दलित असे चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. जातीयवादी व धर्मांध प्रवृत्तीच्या शक्तींनी ही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, मराठा व दलित यांच्यात वाद नाही. दोन्ही समाजातील नेत्यांची यासंदर्भात एकत्रित बैठक घेण्यात आली आहे. सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी दोन्ही समाज प्रयत्न करणार आहेत. त्यासाठी सामाजिक सलोखा परिषद घेण्याचा निर्णय झाला आहे.
मराठा क्रांती मोर्चाने दलित समाजातील नेत्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दोन्ही समाजातील नेत्यांच्या बैठकीत एकत्रितपणे विविध निर्णय घेण्यात आले. याबाबत शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे कुंजीर यांनी सांगितले. सामाजिक सलोख्याचे हे मॉडेल महाराष्ट्रात नेले जाईल, असे रणपिसे म्हणाले. वढु बु. येथील संभाजी महाराजांचे स्मारक विशिष्ट विचारांच्या संघटनांच्या ताब्यात न देता ते शासनाने ताब्यात घेवून त्याचा विकास करावा. तसेच गोविंद गायकवाड महार यांचे योगदानही मान्य करत त्यांची समाधी बांधून योग्य इतिहास जनतेपर्यंत पोहचवावा, असे गायकवाड यांनी नमुद केले.
भाजपासोबत तात्वीक युती नाही
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी उपमहापौर धेंडे यांनी केली. तसेच आम्ही भाजपासोबत असलो तरी ही केवळ राजकीय स्वरूपाची युती आहे. आमची तात्वीक युती नाही. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदार आठवले यांनीही याबाबत भुमिका मांडल्याचे धेंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दोन्ही समाजाच्या बैठकीतील निर्णय व मागण्या -
- दंगलीचे सुत्रधार मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांना अटक करून त्यांची नार्कोटेस्ट करण्यात यावी.
- कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे २४ तास कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था पुरवावी
- ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये पोलिस संरक्षण द्यावे
- घटनेतील जखमींना २ ते ५ लाख रुपयांची मदत करावी
- अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याबाबत दोन्ही समाजाकडून खबरदारी घेण्यात येईल.