ऑनलाइन लोकमत
मंगळवेढा, दि. 18 - मोदी सरकारने मोठ्या उद्योगपतींची साडेसहा हजार कोटी रूपयाची कर्जे माफ करून सर्वसामान्य जनतेच्या पैशावर डोळा ठेवण्याचे पाप केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर काळा पैसा आणून पंधरा लाख रूपये जमा करणार असल्याचे स्वप्न दाखवून आत्तापर्यंत पाच पैसे ही जमा केले नाहीत. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत महाराष्ट्रातील शेतक-यांवर बुरे दिन आणल्याची खरपूस टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
मंगळवेढा येथे शुक्रवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. रामहरी रूपनवर, आ. भारत भालके, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, तालुकाध्यक्ष काशिनाथ पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, अर्जुन पाटील, भारत पाटील, रामचंद्र जगताप, बाबुभाई मकानदार, भारत बेदरे, लतीफ तांबोळी, प्रकाश गायकवाड उपस्थित होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींनी काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्याचे दिवास्वप्न दाखविले. परंतु अद्यापपर्यंतही ते पैसे शेतक-यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर आले नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेचा भ्रमनिराश झाला आहे, असे मुंडे यांनी सांगितले. शेतामध्ये पिकलेल्या मालांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पंरतु आत्तापर्यंत कोणतीच आश्वासने या सरकारने पाळली नाहीत. शेतक-यांच्या प्रश्नांची जाण या सरकारला नाही. हे सरकार शेतक-यांची चेष्टा करीत असून जनता पाण्याअभावी, जनावरांच्या चा-याअभावी तडफडत आहे, असे सांगितले.
शहरी भागात निवडणूका सुरु असताना ग्रामीण भागामध्ये त्या आचारसंहितेचा संबंध काय? असा सवाल केला . मोदींनी १००० व ५०० रूपयेच्या नोटेवर बंदी घातली असली तरी हा काळा पैसा कोणाकडे आहे, हेही त्यांना माहीत आहे. देशातील ६० ते ६५ उद्योगपतींनी कर्ज बुडवली असून त्यांची नावे जाहीर करावी. उद्योगपतींची कर्जे माफ करून सर्वसामान्य जनतेला या नोटा बदलण्यासाठी जो त्रास होत आहे, याबाबत महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरूणा माळी, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, वसंत मुदगूल, चंद्रकांत घुले, भारत नागणे, विजय खवतोडे, प्रविण खवतोडे, सब्जपरी मकानदार, पांडूरंग नाईकवाडी, संकेत खटके, अनिता नागणे, राजश्री टाकणे, भगिरथी नागणे, सुमन शिंंदे, रेखा जाधव, सुरेखा पवार, पारुबाई जाधव, रेश्मा बेंदरे, राजश्री भगरे, प्रविण हजारे या उमेदवारांसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. सुत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले.