लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव/ धुळे : शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा झालेली नाही. जेव्हा जेव्हा सामान्य माणसांवर व शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे दिसेल, तेव्हा-तेव्हा शिवसेना आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला की नाही, हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे बुधवारी खान्देश दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत पाळधी ता. धरणगाव येथे शेतकरी संवाद तसेच धरणगाव, पारोळा व धुळे येथे जाहीर सभा झाल्या. त्यात ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, २०१२ ते २०१६पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचा निर्णय आधी जाहीर झाला. नंतर ही मर्यादा मागील वर्षांमध्ये वाढवून २००९पर्यंत करण्यात आली. पण जेव्हा २०१७पर्यंत ही मर्यादा वाढविली जाईल, तेव्हाच सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल.शिवसेनेवर टीका करणाऱ्या अजित पवार यांच्या तोंडात भ्रष्टाचाराचा बोळा कोंबला गेल्याने ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प आहेत, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता असताना शेतकऱ्यांच्या समस्यांचा विसर पडला. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना सत्तेवरून दूर करून कोपऱ्यात टाकले. त्यांचे दिवस संपल्याचे ठाकरे म्हणाले. भाजपा नेत्यांचे गोडवे गाणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरदेखील त्यांनी टीकास्त्र सोडले़>...तर मंत्रालयासमोर ढोल बडवू जिल्हा बँका कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरासमोर ढोल बडवितात म्हणून आम्ही राज्यभर जिल्हा बँकांसमोर ढोल बडविले़ परंतु तरीही कर्जमाफीचा लाभ दिला गेला नाही, तर मंत्रालयासमोर ढोल बडवू, असेही ठाकरे म्हणाले़
शिवसेना सरकारमध्ये असली तरी सरकारजमा नाही
By admin | Published: July 13, 2017 4:56 AM