पुणे : खुदा ढुंडनेसे नही मिलता, मगर जो खुदा को ढुंडते है, उन्हेही खुदा मिलता है! या शायरीचा हवाला देत, मेहनतीशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही, यशाला कुठलाही शार्टकट नाही त्यामुळे यश मिळवण्यासाठी अपार कष्ट करणं गरजेचं आहे, असं मत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दुसरा आलेला काश्मिरच्या अथर अमीर याने व्यक्त केले.सरहद या संस्थेच्या वतीने अथर अमीर याचा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी यांच्या हस्ते पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी अथरच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी तो बोलत होता.आपल्या वाटचालीबद्दल बोलताना अथर पुढे म्हणाला, की माझं आयएएस होण्याचं स्वप्न नव्हतं, मात्र जनतेचे प्रश्न बघून यांवर उपाय शोधण्यासाठी मी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्यातील आवडीला ओळखून त्याला आपलं करिअर करण्याचा सल्ला त्याने या वेळी दिला. सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविक केलं, तर जाहिद भट याने सूत्रसंचालन केले. या वेळी सरहदचे शैलेश वाडेकर, आसामच्या आॅल इंडिया बोर्ड आॅफ स्टुडंटचे कौस्तुभ बासुमटारी व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते.
>भारताविषयी बोलताना अथर म्हणाला, की भारत हा मोठ्याप्रमाणावर संधी उपलब्ध असलेला देश आहे. त्याचबरोबर सर्वांत मोठी लोकशाही भारतात आहे. भारतात प्रत्येक गोष्टीत विविधता असून, ही विविधताच जगासमोर आदर्श आहे. मात्र, अनेक समस्यांनी भारताला ग्रासलं आहे. भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असताना दुसरीकडे कुशल कामगारांची आपल्याकडे कमतरता आहे. अशा समस्यांवर उपाय शोधण्याचे काम आपण करायला हवं. आपल्याकडे प्रशासन व नागरिकांमध्ये मोठं अंतर पाहायला मिळतं, हे अंतर भरुन काढायचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला हवं.अधिकाऱ्यांनी लोकांचं म्हणनं ऐकून आपल्या कामाची नवीन व्याख्या करणं गरजेचं आहे.