मुंबई : कचऱ्याच्या डम्पिंगसाठी मुंबईसह राज्यात यापुढे कुठेही जागा दिली जाणार नाही. ओला आणि सुका कचरा विलग करून त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांसाठीच जागा दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले. मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या भीषण आगीवरून अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, संदीप नाईक, कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक सदस्यांनी लक्षवेधी सूचना मांडली आणि तीव्र भावनाही व्यक्त केली. यापुढे प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी आणलेल्या कचऱ्यावर तत्काळ प्रक्रिया करणे अनिवार्य असेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. वेगवेगळ्या प्रकारचा कचरा एकत्रितपणे डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो आणि अशा परिस्थितीत लागलेली आग भीषण असते. आता प्रक्रिया प्रकल्पांच्या ठिकाणी येणारा कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा आणला जाईल. त्यासाठी घरोघरी आणि त्या-त्या वॉर्डांमध्ये असा कचरा विलग करून ठेवणेही अनिवार्य केले जाईल. आज अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प आलेले आहेत. त्यातून प्रदूषण होत नाही, दुर्गंधीही अजिबात येत नाही. असे तंत्रज्ञान असलेले प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. देवनारच्या आगीनंतर उच्च न्यायालयाने मुंबई शहरात कुठेही नवीन बांधकामास परवानगी देण्यात येणार नाही, असे म्हटले आहे. या बाबीकडे काही सदस्यांनी लक्ष वेधले असता, अशा प्रकारचा कोणताही आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याचे मुख्यमंत्र्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले.देवनार आणि मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडवरच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना २००९मध्येच शासनाने मुंबई महापालिकेला दिलेल्या होत्या. मात्र, ते काम होऊ शकले नाही. मुंबईत दररोज ९ हजार ५०० मेट्रिक टन कचरा तयार होतो. देवनार आणि मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा साठवला जातो. कांजूर येथे ३ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर बायोरिअॅक्टर तंत्रज्ञानाने प्रक्रिया केली जाते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ओला आणि सुका असा कचरा व्यवस्थित विलग करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना करामध्ये सवलत देण्याचा निर्णय त्या-त्या महापालिकांनी घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आशिष शेलार, अनिल गोटे, अमित साटम, अमित देशमुख, सरदार तारासिंह, मनीषा चौधरी आदी सदस्यांनी लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेतला. (विशेष प्रतिनिधी)
यापुढे डम्पिंगसाठी जागा नाही
By admin | Published: March 11, 2016 4:04 AM