मुंबई : उद्योगपोषक वातावरणासाठी असलेल्या ‘ईझ आॅफ डुर्इंग बिझनेस’मध्ये देशातील पाच राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही. अर्थात ही यादी अंतिम नाही. चालू महिन्याअखेर त्या बाबतचे अंतिम रँकिंग जाहीर होईल, असे राज्याच्या उद्योग विभागाने स्पष्ट केले. ईझ आॅफ डुर्इंग बिझनेसमध्ये देशात पहिले येण्यासाठी राज्याराज्यात सध्या जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. केंद्र सरकारच्या ‘डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन’ने (डीआयपीपी) चालू महिन्याअखेर या बाबतचे रँकिंग जाहीर करेल, अशी शक्यता आहे. सध्या तेलंगण आघाडीवर असून त्या खालोखाल आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड आणि झारखंड असा क्रम आहे. तेलंगणा आणि आंध्र या दोन शेजारी राज्यांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. डीआयपीपीतील रॅँकिंग आठवड्यागणिक बदलत असते. अंतिम रँकिंग हे कोणते राज्य आघाडीवर आहे हे निश्चित करते. विशेषत: स्थानिक नोकरशाही किती प्रभावीपणे काम करते यावर या अभियानाचे यश अवलंबून असते, असा अनुभव आहे. गेल्यावर्षी (२०१५) गुजरात पहिल्या तर आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होते. त्या खालोखाल झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश असा क्रम होता. गेल्यावर्षी ९६ निकषांवर रँकिंग निश्चित करण्यात आले होते. यंदा तब्बल ३४० निकषांची कसोटी पार करावी लागणार आहे. राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव विजय सिंघल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, डीआयपीपीच्या चांगल्या रँकिंगसाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेतच पण मेक इन इंडियातील अर्धी गुंतवणूक महाराष्ट्रात येतेय ही बाब आपल्याकडील उद्योगपोषक वातावरणाची साक्ष देणारीच आहे. उद्योगांच्या परवानग्या कमीतकमी करणे, करप्रणालीमध्ये सुटसुटीतपणा, कामगार कायद्यात सुलभता असे अनेक उपाय यंदा करण्यात आले आहेत. सिंगारपूरच्या नामांकित संस्थेने त्यावर अलिकडेच शिक्कामोर्तब केले आहे. (विशेष प्रतिनिधी)
पहिल्या पाचमध्येही महाराष्ट्र नाही
By admin | Published: October 11, 2016 5:46 AM