वॉशिंग्टन : अमेरिकेचा नायजेरियात सैन्य कारवाई करण्याचा सध्या कोणताही विचार नसून अपहरण करण्यात आलेल्या जवळपास ३०० मुलींच्या शोधात मदतीसाठी नायजेरियन सैन्याला केवळ मदत करण्याचा विचार करत आहे. फ्रान्स, ब्रिटन आणि चीननेही मदत देऊ केली आहे. बोको हरम या दहशतवादी संघटनेने गेल्या महिन्यात नायजेरियातील एका शाळेतून ३०० मुलींचे अपहरण केले होते. या मुलींच्या सुटकेसाठी नायजेरियन सरकारवर दबाव वाढत असून जागतिक महासत्तांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बोको हरामच्या प्रमुखाने सोमवारी एक चित्रफीत प्रसिद्ध करून ओलीस मुलींना बाजारात विकण्याची धमकी दिली होती. बोको हरमची पाळेमुळे उखडून लावण्यासाठी शक्यतो सर्व मदत करण्याची ग्वाही अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी दिली आहे. सध्या आमचा सक्रिय सैन्य अभियान राबवण्याचा विचार नाही. अपहृत मुलींच्या सुरक्षित सुटकेसाठी नायजेरियन सरकारला मदत उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे. मदतीचे स्वरूप हे मुख्यत: सल्लागारासारखे असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. नायजेरियन राष्ट्राध्यक्ष जोनाथन गुडलक यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे मदतीची मागणी केली होती. गेल्या १४ एप्रिल रोजी नायजेरियाच्या बोर्नो राज्यातील चिबोक गावातल्या एका शाळेतून २७६ मुलींचे बोको हरमच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले. लष्करी साहित्य, कायदा अंमलबजावणी विशेषज्ञता आणि संसाधनांच्या माध्यमातून आम्ही नायजेरियाला मदत देऊ. अमेरिका यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत मिळून काम करील, असे केरी म्हणाले. (वृत्तसंस्था)
नायजेरियातील ५०० शाळांना सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी देशातील उद्योगपतींच्या एका समूहाकडून एक कोटी डॉलरची मदत मिळणार आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेचे दूत आणि माजी ब्रिटिश पंतप्रधान गार्डन ब्राऊन यांनी नायजेरियात ‘सुरक्षित शाळा अभियान’ राबविण्याची घोषणा केली आहे.
फ्रान्सने साहेल भागात बोको हरमची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी नायजेरियाच्या शेजारी देशांत ३ हजार सैन्य तैनातीची घोषणा केली आहे.