पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा, जयंत पाटील यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 05:42 PM2018-05-03T17:42:14+5:302018-05-03T17:58:49+5:30
सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार....
क-हाड - ‘राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी चर्चा केली. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नसल्याचा निर्णय पक्षातर्फे घेण्यात आला आहे,’ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी गुरुवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन अभिवादन केले. तसेच दिवंगत पी. डी. पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन तेथेही प्रतिमेस अभिवादन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजेश पाटील-वाठारकर, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, पंचायत समिती सभापती शालन माळी, आदींची उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मोहन प्रकाश व राष्ट्रवादी पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये चर्चा झाली व आमच्या पक्षाचे व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आलेले आहेत. लोकसभेच्या दोन जागा गोंदिया राष्ट्रवादी पक्ष व पालघर काँग्रेस पक्ष लढवेल. ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे निधन झाल्यामुळे पलूस-कडेगाव जागेवर डॉ. विश्वजित कदम लढतील असे दिसते. काँग्रेस पक्षाला पलूस-कडेगाव जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याची घोषणा मी या ठिकाणी करीत आहे. पलूस-कडेगावच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही,’ असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.