पुणे : उजव्या चळवळीच्या व्यक्ती जातीयवादी आहेतच. पण डावेदेखील धुतल्या तांदळासारखे नाहीत. तेसुद्धा जातीयवादीच आहेत. म्हणूनच परिवर्तनाची चळवळ पुढच्या टप्प्यापर्यंत जात नाही. ही चळवळ पुढे जात नसल्याने संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदाच उरलेला नाही, अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी डाव्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र याचा अर्थ संघ गोंजारण्यासारखा किंवा पुजण्यासारखा आहे, असा होत नाही, अशी सावधपणाची भूमिकाही त्यांनी घेतली.ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांच्या १०५ व्या जन्मदिनानिमित्त रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान वाई आयोजित ‘हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटन एक प्रबोधनात्मक मंथन’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हास पवार होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्राचे प्रमुख डॉ. राजा दीक्षित, पत्रकार संजय आवटे, अॅड. शारदा वाडेकर, प्रतिष्ठानचे विश्वस्त रमेश चव्हाण उपस्थित होते.सबनीस यांनी रा. ना. चव्हाण यांच्या हिंदू, हिंदुत्व आणि हिंदू संघटनाच्या वैचारिक लेखनाचा धांडोळा घेताना संघाची निती, विचारसरणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने हिंदू हा धर्म नसून, जीवनप्रणाली आहे आणि ती भारतीयांशी सुसंगत आहे, असा निकाल दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदू या शब्दाचा गैरवापर करून भाजपाप्रणीत हिंदुत्ववादी संघटनांनी बहुसंख्येच्या बळावर धर्मनिरपेक्ष हा शब्द बाजूला केला. प्रतिष्ठानचे विश्वस्त सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.त्यांची विद्वता नासली आणि कुजली...कॉम्रेड शरद पाटील हे विद्वान होते. पण अब्राम्हणी तत्त्वज्ञानाच्या विषम अशा मांडणीमध्ये त्यांची विद्वता नासली आणि कुजली. म्हणून त्यांची भूमिका क्रांतिकारी आणि सर्व समाजाला जोडू शकली नाही, असे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात उल्हास पवार यांनी अतिरेकी अस्मिता जागृत होत असताना विवेकी हिंदुत्वाची मांडणी रा. ना. चव्हाण करतात. सुधारक आणि विचारवंतांची तुलना करण्यापेक्षा त्यांची विवेकी चिकित्सा करायला हवी. वाद, परिसंवाद आणि संवादातून विवेचन व्हायला पाहिजे याकडे लक्ष वेधले.हिंदू शब्द घुसडवून हा हिंदूंचाच देश असल्याचे भासवत हिंदू धर्म आधारित राज्यघटना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, म्हणून मुस्लिमांचा विटाळ आता न मानण्याची संघप्रमुख मोहन भागवत यांची सुधारणावादी भूमिका, रामजन्मभूमीच्यानिमित्ताने कायदा करून तो सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही याची पूर्ण खात्री असताना २०१९ ची निवडणूक लढवण्याची चाललेली धडपड या गोष्टी दिसत आहेत. पण रा. ना. चव्हाण यांचे हिंदुत्व यापेक्षा खूप वेगळे आहे. रा. ना. चव्हाण यांचा समृद्ध वारसा निर्माण होण्याची गरज आहे.अतिरेकीला जनाधार मिळाला...आजच्या टप्प्यावर अतिरेकी आणि राजकीय हिंदुत्वाला यश आणि जनाधार मिळाला आहे. हे असे का झाले, याची वस्तुनिष्ठ कारणमीमांसा हिंदुत्ववाद्यांकडून व्हायला हवी, तर विरोधकांकडून ठोस कृतीतील विचार अपेक्षित आहे. दोन्हींकडून आत्मपरीक्षणाची गरज आहे. ज्यामध्ये दोघेही कमी पडत आहे. हे आत्मपरीक्षण योग्य झाले तर भारतचे धार्मिक भवितव्य चांगले आहे अन्यथा ते चिंताजनक आहे. इतिहासाचे विकृतीकरण, महापुरुषांचे अपहरण चालू आहे. ऐतिहासिक असाक्षरता पाहायला मिळत आहे. यामध्ये हिंदुत्वाचा विचार करणे कसरतीचे काम आहे.- डॉ. राजा दीक्षित
'संघाला झोडपण्याशिवाय डाव्यांकडे दुसरा धंदा नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 3:30 AM