मुंबई: सत्तास्थापनेच्या फॉर्मुल्याबाबत शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. प्रस्ताव आल्यास चर्चेची आमची तयारी असेल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. सत्ता स्थापनेबाबत रणनिती ठरविण्यासंदर्भात भाजपच्याकोअर कमिटीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीलाच जनादेश दिलेला आहे.
फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाने एकमताने नेता म्हणून निवड केली आहे. भाजपच्या संसदीय समितीनेही त्यांच्या नावास मंजुरी दिली आहे. त्यांच्याच नेतृत्वात भाजपने निवडणूक लढविलेली होती आणि तेच मुख्यमंत्री होतील.कसला प्रस्ताव? राऊत यांचा सवालचंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खा. संजय राऊत म्हणाले, कसला प्रस्ताव? ठरलंय त्यानुसार करा. फिफ्टी-फिफ्टीचा निर्णय हाच प्रस्ताव आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच्या बैठकीत जे ठरलं त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी वेगळ्या प्रस्तावाची आणि चर्चेची गरज काय? असा सवाल राऊत यांनी केला. एकाच ओळीचा प्रस्ताव आहे. तो म्हणजे शहांच्या उपस्थित जे ठरलंय तेच करा. त्याची अंमलबजावणी करा. त्याची अंमलबजावणी करत असल्याचं लिखित द्या. तरच पुढची चर्चा होईल, असेही राऊत यांनी सांगितले.