कराड : ‘शिवसेना-भाजपाची युती मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुटली आहे. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढून घेण्याचा अन् भाजपाने राष्ट्रवादी काँगे्रसचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगतानाच, आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या बरोबरच आहेत,’ असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्त केला.रावसाहेब दानवे रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर होते. त्या वेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘मुंबईत पारदर्शक कारभार या मुद्द्यावरून भाजपा-शिवसेनेत दुरावा निर्माण झाला आहे. या पूर्वीही असा दुरावा निर्माण झाला होता. पुन्हा एकत्र आलो. त्यांचा आणि आमचा असे स्वतंत्र दोन पक्ष आहेत. दानवे म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावर असताना, सत्तर हजार कोटी रुपये खर्च करूनही राज्यातील शेती भिजविता आली नाही. चोवीस टीएमसी पाणी अडविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादीला आठ वर्षे लागली. ते पाणी भाजपाने एका वर्षात अडवून दाखवले. भाजपाला शेतीतले कळत नाही. हा जातीयवादी पक्ष आहे, असा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने सगळीकडे अपप्रचार केला जातोय. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ सबका विकास’च्या माध्यमातून सर्व धर्मातील लोकांचा विकास केला आहे.’ सर्वच क्षेत्रात विकासाच्या कामांना सुरुवात केली आहे. उलट ६८ वर्षांत जे काँगे्रस राष्ट्रवादीला जमले नाही, ते दोन वर्षांत भाजपाने करून दाखवले. त्यामुळे भाजपावर जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही.’ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच नाही
By admin | Published: January 30, 2017 12:16 AM