पुणे : कार्यक्रम किंवा फ्लेक्सच्या माध्यमातून मिरवण्याची मला हौस नाही. गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळेच राजशिष्टाचार पाळले जावेत, असा आग्रह धरतो, त्यात काही गैर असल्याचे वाटत नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. महापौरांनी केलेल्या आरोपांना आपल्यालेखी काही महत्त्व नाही, असे ते म्हणाले.भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक संपर्क कार्यालयात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना बापट म्हणाले, ‘‘शहराच्या सामाजिक, राजकीय जीवनात गेली ४० वर्षे सक्रियपणे काम करतो आहे. फ्लेक्स, जाहिराती, कार्यक्रम यातून मिरवणे मला स्वत:लाच आवडत नाही, पण राजशिष्टाचार पाळले गेले पाहिजेत. पालकमंत्री या पदाला महत्त्व आहे. त्यांना टाळून कार्यक्रम करणे हा माझा नाही, तर त्या पदाचा अवमान आहे. त्यामुळेच आपण नगरविकास विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. ’’बापट यांच्या या तक्रारीवर महापौर प्रशांत जगताप यांनी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्यामुळेच पालकमंत्री असा हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत राज्य सरकारने अशी काही भूमिका घेतल्यास आपण त्याचा जाब विचारू, असे म्हटले आहे. बापट यांचे लक्ष याकडे वेधले असता ते म्हणाले, ‘‘शहर विकासाच्या कामात भाजपाचा किती सहभाग आहे. त्याची कल्पना पुणेकरांना आहे. महापौरांनी त्याबाबत सांगू नये. आमचा विरोध विकासकामांना नाही तर ती करताना पाळावयाच्या राजशिष्टाचारांकडे आहे. सार्वजनिक निधीतून पक्षाची जाहिरात करणेही अयोग्य आहे. तक्रार त्यासाठी केलेली आहे. त्यांच्या आरोपांची मी फिकीर करीत नाही.’’(प्रतिनिधी) >राज्य सरकारने गेल्या वर्षांत केलेली कामे, त्याचे परिणाम आणि भविष्यातील योजनांची माहिती बापट यांनी या वेळी दिली. शहरातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले आहेत. मेट्रो, नदी सुधार यांसारख्या प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद करण्यातही यश मिळाले आहे, असे ते म्हणाले. खासदार अनिल शिरोळे, पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या वेळी निवडणुकीत दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल आहे, असे बापट यांनी सांगितले.
मिरवण्याची हौस नाही; पण राजशिष्टाचार पाळलेच पाहिजेत
By admin | Published: November 02, 2016 1:01 AM