Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १ लाखाच्यावर गेली आहे. पण मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात कोरोनानं मृत्यू झालेल्यांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद झालेली नसून ती येत्या दोन दिवसांत करण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने बुधवारी दिले आहेत. यासोबत नोंद न झाल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
मृत्यूंच्या आकड्यात ११ हजार ६१७ मृत्यू वाढल्यानंतर राज्यातील मृतांच्या संख्येत किमान दहा टक्के वाढ होणार आहे. १८ सप्टेंबर २०२० ते २० मे २०२१ या काळात जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेने राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदविलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्याने दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे समोर आले आहे. राज्याचा दैनंदिन कोरोना अहवाल आणि आकडेवारी प्रशासनाकडून जारी करण्यात येतो. पण विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखविण्यात आल्याचे दिसून आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
दरम्यान, राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, "रोजची आकडेवारी अपडेट करणे ही एकूण संख्या लक्षात घेता खूप मोठे काम आहे. यात जो आकडेवारी मधला फरक सुरुवातीपासून राहीला आहे तो लक्षात घेता आम्ही गेले काही दिवस त्या केसेसची नोंद करुन घेत आहोत. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या राज्याच्या अहवालात आम्ही ती माहिती तळटीप स्वरुपात प्रसिद्ध देखील करत आहोत. आत्तापर्यंत जवळपास ६००० नोंदी झाल्या आहेत आणि आणखी माहिती घेऊन ती भरण्याची प्रक्रिया सुरु आहे."
राज्य सरकारकडून वारंवार कोरोनामुळे मृत्यू झालेला आकडा अजिबात लपविला जात असल्याचा दावा केला जात असताना आता इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यूंची नोंद कशी केली नाही? याला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत आहे.