पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेला तब्बल ७५ हजार अनधिकृत बांधकामांचा अहवाल पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडे पाच-सहा महिन्यांपूर्वीच देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. अनधिकृत बांधकामांचा अहवाल देऊनदेखील पीएमआरडीएकडून कारवाई का होत नाही, असे विचारले असता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनधिकृत बांधकामांबाबत आतापर्यंत एका ओळीचादेखील अहवाल आला नसल्याचे स्पष्टीकरण पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी दिले. यामुळे संपूर्ण महसूल यंत्रणा कामाला लावून केलेल्या सर्व्हेचे नक्की झाले काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.हवेली तालुक्यातील नऱ्हे येथे एक अनधिकृत इमारत कोसळून एकाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुणे शहरालगतच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा विषय चर्चेचा विषय ठरला. जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यांपासून सर्व तहसीलदार, प्रांत अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांचा तीन-चार महिने कामाला लावून संपूर्ण जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये जिल्ह्यात तब्बल ७५ हजार इमारतीचा अनधिकृत असल्याचे समोर आले.पुणे शहरालगतच्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी सन २०१० मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना बांधकाम परवानगी देण्यास बंदी घातली. त्यानंतर शहरालगतच्या परिसरात बांधकाम परवानगी देण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:कडे घेतले होते. परंतु, ग्रामीण भागात नियोजन प्राधिकरण नक्की कोण, हे स्पष्ट होत नसल्याने या अनधिकृत बांधकामांवर कोणी कारवाई करायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पीएमआरडीएच्या स्थापनेमुळे हा प्रश्न मार्गी लागला असून, पुणे,पिंपरी चिंचवड शहरासह हवेली, शिरूर, मावळ, मुळशी, भोर, दौंड, खेड तालुक्यातील सुमारे ८०० पेक्षा अधिक गावांमध्ये नियोजन प्राधिकरण म्हणून पीएमआरडीए काम पाहणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेची सर्व माहिती पीएमआरडीएकडे देण्यात येणार असल्याचे राव यांनी सांगितले होते. त्यानंतर या अनधिकृत बांधकामांच्या कारवाईचा निर्णय संबंधित अधिकारी घेतील, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले होते. हवेली तालुक्यातील नऱ्हे येथे एक अनधिकृत इमारत कोसळून एकाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर पुणे शहरालगतच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामांचा विषय चर्चेचा ठरला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत पीएमआरडीएच्या कार्यालयाकडे एका ओळीचादेखील अहवाल आला नाही. ही माहिती देण्यासाठी आम्ही वेळोवेळी स्मरण पत्रेदेखील दिली आहेत. परंतु अद्यापही ही माहिती मिळालेली नाही. यामुळे पीएमआरडीएच्या वतीनेच सर्व्हे करून अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.- महेश झगडे, पीएमआरडीए मुख्य कार्यकारी अधिकारी
बेकायदा बांधकामांचा अहवाल नाहीच
By admin | Published: May 20, 2016 1:09 AM